पाटण:- गुढीपाडवा मराठी नवीन वर्ष, नवीन सुरवात… या वर्षाच्या स्वागताला शोभायात्रेसह ग्रामीण भागातील लहान मुलांना, महिला , नागरीकांना पुस्तकांची ओळख तसेच साहित्याची ओढ निर्माण व्हावी यासाठी पाटण तालुक्यातील पहिले एक दिवसीय ग्रामीण मिनी साहित्य संमेलन “जागर साहित्याचा” सुरुल नगरीत होत असुन या साहित्य संमेलनात ग्रामीण वाद्यांच्या गजरात शोभायात्रा, ग्रंथ दिंडी, ग्रामीण महिलांचा गित ओव्या, ग्रामीण साहित्यिकांची व्याख्याने – कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम होणार असल्याचे सातारा जि. प. माजी उपाध्यक्ष आणि स्वा. सै. कै. बाळासाहेब ( भाई भडकबाब ) पाटणकर साहित्य संमेलन समितीचे प्रमुख विक्रमबाबा पाटणकर यांनी सुरुल येथे नियोजन बैठकीत सांगितले.
ग्रामीण भागात वाचनाची सवय निर्माण व्हावी. लोकांना कथाकथन, कविता, व्याख्यान, सादरीकरण या कलांविषयी आवड निर्माण व्हावी अशा हेतूने रविवार दि. १८ रोजी गुढीपाडवा मुहूर्तावर सायंकाळी ४ वा. ग्रामीण मिनी साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनात लिम्का बुक रेकॉर्डचे मानकरी यशेंद्र क्षीरसागर यांचे व्याख्यान, ग्रामीण विनोदी कथाकथनकार – लालासो अवघडे यांचे कथाकथन या खेरीज बतावणी, कविता, ग्रामीण गित-ओव्या, वाचन इ. असा कार्यक्रम होणार आहे. “जागर साहित्याचा” या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी, महिला- नागरिक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थ मंडळ सुरूल ता. पाटण यांनी केले आहे.
सुरुलमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शोभायात्रेसह “जागर साहित्याचा”
RELATED ARTICLES