कोरेगाव : लोकपाल कायद्यावरुन केंद्रातील भाजप सरकारच्या तोंडचे पाणी पळविणारे ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी कायद्याच्या प्रसारासाठी भारत दौरा सुरु केला असून, त्याच अनुषंगाने शुक्रवार दि. 19 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता बाजार मैदान, कोरेगाव येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी ते भाजप सरकारचा खूरपूस भाषेत समाचार घेणार आहेत.
या संदर्भात सभेचे निमंत्रक तथा भारतीय जनसंसद संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय माने व प्रशांत गुरव यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, आण्णा हजारे यांच्या अभ्यासपूर्ण धोरणांमुळेच देशातील सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार मिळाला आहे. या अधिकारामुळे सामान्यांवरील अन्याय दूर होत चालला आहे. आता आण्णांनी प्रशासनामध्ये आणि सरकारमध्ये पूर्ण पारदर्शकता असावी या हेतुने लोकपाल कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासाठी त्यांनी भारत दौरा सुरु केला आहे. याच दौर्यामध्ये त्यांची कोरेगावात जाहीर सभा होणार आहे.
जाहीर सभेत आण्णा लोकपाल कायद्याची अंमलबजावणी, शेतकर्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन, सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या समस्या, शेतकर्यांच्या मूलभूत समस्या व शेतीमालाला हमीभाव, आजी-माजी सैनिकांच्या समस्या आणि निवडणूक पध्दतीच्या सुधारणांबाबत उहापोह करणार आहेत. त्यांच्यासमवेत भारतीय जनसंसद संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक सब्बन यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. आण्णा हजारे यांच्या दौर्याचे नियोजन करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात संपर्क मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.
गावपातळीवर जाऊन सामान्य जनतेशी समन्वय साधला जात आहे. सभेच्या यशस्वीतेसाठी धरणग्रस्त नेते शिवाजीराव गाढवे, सुरेश येवले, रमेश माने, मनोहर वाघ, चंद्रकांत कांबळे, जर्नादन शिंदे, अनिल बोधे हे परिश्रम घेत आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची तोफ शुक्रवारी कोरेगावात धडाडणार
RELATED ARTICLES