पाटण:- पाटणच्या उत्तरेस असलेल्या केरा नदीच्या खोऱ्यात बुधवारी रात्री १०.३० ते गुरवारी पहाटे ४.३० वा. पर्यंत पाऊसाने हाहाकार माजवला. या सहा तासाच्या काळात ढगफुटी झाल्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला. सहा तासात सरासरी ४५० ते ५०० मि.मी. पाऊस झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केरा नदीच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य नदीपात्रापासून सरासरी पंधरा ते वीस फुटाच्या उंचीपर्यंत नदीचे पात्र वाहत असल्याचे झालेल्या नुकसानीवरुन निर्देशनास आले. अनेक ठिकाणी नदीकाकाठावरील शेती पिकासह वाहून गेली. शेतकऱ्यांचे शेतीपंप वाहून गेले. पाटण पासून ते केरळ, मणदुरे, निवकणे, दिवशी, जुंगटी, चापोली, आरल, खिवशी, घाणव, आंबवणे, चिटेघर, तामकणे, बोंद्री, कातवडी, मेष्टेवाडी, सुरुल, बिबी, मेंढोशी, साखरी आदी गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांच्या माथ्यावर आले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
या सालातील पाऊसाच्या सुरवातीस केरानदीच्या खोऱ्यात ढगफुटीच्या स्वरूपात पाऊसाने सलामी दिली. बुधवारी दिवसभर पाऊसाची उसंतच होती. रात्री आठ वा. नंतर पाऊसाला सुरवात झाली. मात्र रात्री १०.३० वा. नंतर पाऊसाचा जोर वाढत गेला. ते गुरवारी पहाटे ४.३० वा. पर्यंत जोर वाढतच होता. या सहा तासाच्या काळात केरा नदीच्या खोऱ्यात ओढे, नाले, ओघळ दुथडी भरुन वाहत होती. मार्ग मिळेल तिकडे पाणी जात होते. शेताचे, बांध-ताली फुटल्या माती सह पिके वाहीली, बुडाली अनेक ठिकाणी शेतीच वाहून गेली. केरा नदीने या काळात उघ्र रुप धारण केले. पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. नदीपात्रापासून किमान पंधरा ते वीस फुटांपर्यंत पाणी वाहिले. नदीकाकाठावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिकासह शेती वाहून गेली. ऊस शेती मुळासकट वाहून गेली. शेकडोंच्या वर शेतकऱ्यांचे शेती पंप वाहून गेले. केरा नदीच्या इतिहासात कधी ऐवढा मोठा पूर नदीला आल्याचे ऐकीवात नाही. असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
कातवडी येथे गोठा पडल्याने बैलासह दोन म्हैसी जखमी.
बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीत कातवडी येथे आनंदा पावसकर यांचा गुरांचा गोठा पडला. या गोठ्यात असलेल्या बैलाचे उजव्या बाजूचे शिंग मोडल्याने बैल जबर जखमी झाला. यासह दोन म्हैसी जखमी झाल्या आहेत.
* ढगफुटीत झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून तातडीने पहाणी.
* शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न.- सभापती राजाभाऊ शेलार
केरा नदीच्या खोऱ्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीने प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार योगेश्वर टोंपे, सभापती राजाभाऊ शेलार, गटविकास अधिकारी मिना साळुंखे यांनी तातडीने करुन झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत. अशा सुचना कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी सभापती राजाभाऊ शेलार यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले.
शेतकऱ्यांना आठ दिवसात नुकसान भरपाई द्या. अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल.- विक्रमबाबा पाटणकर.
केरा नदीच्या खोऱ्यात बुधवारी झालेल्या ढगफुटी मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप हंगामाची पेरणी बहुतांश शेतकऱ्यांनी केली होती. या ढगफुटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती पिकासह वाहून गेली आहे. शेतकऱ्यांचे एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. शेकडोच्यावर शेतीपंप वाहून गेले आहेत. या नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीशिवाय पर्याय उरलेला नाही. शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटापासून वाचवायचे असेल तर आठ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.