Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीऊन - पाऊस, सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट - पाऊसाच्या सरीवर सरी ;...

ऊन – पाऊस, सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट – पाऊसाच्या सरीवर सरी ; कोयना धरणातील पाणीसाठा ७६.०७ टि.एम.सी,

 

पाटण:- कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात मंगळवारी दिवसभर ते बुधवारी सकाळी आठ वा. पर्यंत पाऊसाच्या सरीवर सरी कोसळत असताना बुधवारी दिवसभर मात्र पाऊसाने उसंत देऊन उघडझाप दिली. कधी ऊन तर कधी पाऊस असा पाऊसाचा लपंडाव सुरु होता. तर अधुनमधून सोसाट्याचा वारा तर कधी ढगांचा गडगडाट होत होता. बुधवारी दिवसभर चाललेल्या निसर्गाच्या या खेळाला नागरीकांनी देखील समर्थन दिले. मात्र मंगळवारी सांयकाळी ५ वा. ते बुधवारी सांयकाळी ५ वा. पर्यंत या २४ तासात कोयना येथे- २९४ मि.मी, नवजा – २१४ मि.मी, महाबळेश्वर – १८२ मि.मी. या विक्रमी पाऊसाची नोंद झाली. तर कोयना धरणातील पाणी साठा – ७६.०७ टि.एम.सी. इतका झाला. धरणातील पाणी साठा ८० टि.एम.सी. पर्यंत गेल्यास व पुढील दिवसात कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊसाचे प्रमाण वाढल्यास कोणत्याही क्षणी नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल.

पाटण तालुक्यात सलग पाच दिवस पाऊसाने माजवलेल्या हाहाकारा नंतर आज बुधवारी मात्र दिवसभर उघडझाप देऊन पाऊसाने उसंत दिली. सोमवार, मंगळवार व बुधवार सकाळपर्यंत झालेल्या पाऊसाने पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर दरडी कोसळल्या. मालदन ढेबेवाडी घाट रस्ता, कळकेवाडी कुसरुंड रोड, गुजरवाडी घाट रस्ता या ठिकाणी दरडी कोसळल्या या दरडी जेसीबीच्या साह्याने हटविण्यात येवून रस्ते मोकळे करण्यात आले. तर त्रिपुडी, मंद्रुळ कोळे आदी ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या

पाटण तालुक्यासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच दिवसात सततधार पडलेल्या पाऊसाने कोयना धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून सद्या धरणातील पाणी साठा ७६.०७ टि.एम.सी. इतका झाला आहे. तर पाणी पातळी २१३६.०९ फूट, ६५१.२८१ मीटर ऐवढी झाली आहे. बुधवारी दिवसभर सकाळी ८ वा. ते सायंकाळी ५ वा. पर्यंत कोयना- ४७ मि.मी. (एकूण-३२६९ मि.मी.), नवजा- ४८ मि.मी. (एकूण- ३८०७), महाबळेश्वर- ७१ मि.मी. (एकूण-३२०० मि.मी.) इतकी नोंद झाली आहे.

 

तहसीलदार रामहरी भोसले यांचा मुळगाव पुलावरून सेल्फी

गेल्या पाच – सहा दिवसापासून पाटण तालुक्यात पडत असलेल्या पाऊसाने तालुक्यातील सर्वच नद्या दुतड्या भरून वाहत आहेत. कोयना नदीपात्राची पाणी पातळी वाढली असता तहसीलदार रामहरी भोसले यांनी बुधवारी सकाळी मुळगाव पुलाची पहाणी केली. यावेळी तहसीलदार यांना मुळगाव पुलावरून कोयना नदीच्या वाढलेल्या पाण्यासोबत स्वत:चा सेल्फी काढण्याचा मोह झाला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular