खटाव : हिदु-मुस्लीम ऐक्य भावना अधिकच दृढ होताना खटावमध्ये पहावयास मिळाले. सध्या घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. त्यातच मुस्लीम बांधवाचा मोहरम सण आला आहे. खटावमध्ये मात्र हे दोन्ही सण एकाच मंडपामध्ये अनोख्या पध्दतीने साजरा झाला आहे.
खटाव मध्ये गेल्या कित्येक वर्षापासुन येथील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर नवसाचा डोला उभा केला जातो. त्याच जागेवर 1972 साली स्थापना झालेले खटावमधील पहिले अजिंक्य सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची गणेशाची मुर्तीची प्रतिष्ठापणा केली जाते. चालु वर्षी मोहरम व गणेशोत्सव बरोबर आल्याने अजिंक्य मंडळाने उभ्या केलेल्या मंडपामध्ये एका बाजुला लाडका गणराज विराजमान झाला आहे तर त्याच छताखाली दुसर्या बाजुला मुस्लीम बांधवांचा पवित्र डोला उभा करण्यात आला आहे.
मानाचा व नवसाचा असणार्या या डोल्याचे मानकरी हिंदु बांधव आहेत. कैलासवासी सदाशिव भराडे यांनी सुरु केलेल्या या प्रथेमध्ये कोणताही खंड पडु न देता त्यांचा नातु शेखर सुरेश भराडे हे या डोल्याची परंपरा तितक्याच धार्मिकतेने चालवत आहे. खटाव मधील या डोल्याचे मानकरी म्हणुन शामराव फडतरे, बाळु बिटले, प्रवीण लावंड, वसंतराव बागल, जितेंद्र पोळ, भिकु मोहीते, जैनुद्दिन आगा, हाशमुद्दिन आगा हे देखील आपली भुमीका चोख बजावत आहेत. मंडळाच्या स्थापनेनंतर 1983 साली अशा पध्दतीचा योग आल होता. त्यानंतर 2018 साली हे दोन्ही सण एकत्र येण्याचा योग आला आहे.
अजिक्य जनसेवा मित्र मंडळाचे वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. 35 वर्षानंतर आलेल्या या योगामुळे चालु वर्षी गणपतीच्या प्रतिष्ठापनेनंतर आलेल्या मोहरम सणातील डोला याच मंडपात उभा करुन हिंदु-मुस्लीम बांधवाच्या ऐक्याचे एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे.या डोल्याची तसेच अजिंक्य मंडळाच्या गणेश मुर्तीची विसर्जन मिरवणुक शुक्रवारी एकत्रीत काढण्यात येणार आहे. अशी माहीती सामाजिक कार्यकर्ते मनोज देशमुख यांनी दिली.

