कोरेगाव: येथील जुनीपेठ प्रभागातील आण्णाभाऊ साठेनगरमध्ये एका खोलीमध्ये जनावराचे मांस बेकायदेशीररित्या विक्रीला ठेवल्याप्रकरणी शहरातील दत्तनगर उपनगरामधील रहिवासी असलेला व्यापारी शराफत मिरा बेपारी याला कोरेगाव पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारीत अधिनियम 1995 च्या कलमानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
जुनी पेठ प्रभागामध्ये जनावरांच्या मांसाची बेकायदेशीर विक्री होत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य होते. यासंदर्भात नगरपंचायतीकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या, त्यानुसार मुख्याधिकारी पुनम कदम-शिंदे यांनी पोलीस ठाण्यात पत्र देखील दिले होते. रविवारी दुपारी एका माहीतगार व्यक्तीने पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांना याबाबत माहिती दिली, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता हवालदार राजू बागवान यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे, हवालदार विजय जाधव व हवालदार राजू बागवान यांनी नगरपंचायतीचे दोन कर्मचारी पंच म्हणून बरोबर घेत आण्णाभाऊ साठेनगरमध्ये शोध मोहीम हाती घेतली, त्यावेळी त्यांना एका खोलीमध्ये शराफत मिरा बेपारी हा जनावराचे मांस विक्री करत असल्याचे आढळून आले. या खोलीचा पंचनामा करुन मांस जप्त करण्यात आले, त्याचे 75 किलो वजन भरले. पोलिसांनी बेपारी याच्याकडे चौकशी केली असता, त्याने दरमहा 1800 रुपये भाड्याने ही खोली भगिरथी विठ्ठल बोतालजी यांच्याकडून भाड्याने घेतली असल्याचे सांगितले. या खोलीमध्ये मांस विक्री करत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडे मांस खरेदीबाबतची पावती मिळून आली नाही. साडेतीन वर्षे वय असलेल्या एका रेडकाचे ते मटण असल्याचे त्याने सांगितले.
याप्रकरणी हवालदार राजू बागवान याने तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारीत अधिनियम 1995 च्या कलमान्वये बेपारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रितसर अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे तपास करत आहेत. पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.