कोरेगाव: श्रीलंका येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय रॉक बॉल स्पर्धेत 16 वर्षाखालील भारतीय संघाने विजेतेपद पटकावले आहे. येथील चॅलेंज अॅकॅडमीचा विद्यार्थी अंगद अजित भोसले याच्या नेतृत्वाखाली संघाने यश मिळवले असून, सुवर्णपदक देऊन संघाचा गौरव करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रासाठी नवा असलेला रॉक बॉल हा खेळ प्रकार अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. चॅलेंज अॅकॅडमीचे संस्थापक दिलीप वेलियावेट्टील, प्राचार्या ऋता जोशी, प्रशिक्षक सचिन साळुंखे यांनी या खेळप्रकारामध्ये सर्वच मुलांना चांगले प्रशिक्षण दिले होते.
राज्यपातळीवरील सामने पुण्यात झाल्यानंतर पानिपत येथे झालेल्या राष्ट्रीय सामान्यातून अंगद भोसले याची भारतीय संघात निवड करण्यात आली. त्याच्या खेळाची पध्दती पाहून, त्याच्यावर संघ प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्याने नेत्रदीपक खेळ करत विजेतेपद खेचून आणत सुवर्णपदक पटकावले आहे. एकसळ, ता. कोरेगाव येथील स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साखवळकर शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक, प्रगतशील शेतकरी व ऑल इंडिया कुस्ती चॅपियन पै. बलभीम भोसले यांचा नातू तर कृषीभूषण पुरस्कारप्राप्त पै. अजित भोसले यांचा अंगद हा मुलगा आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंगद भोसले याला सुवर्णपदक
RELATED ARTICLES