Thursday, April 24, 2025
Homeअर्थविश्वअविनाश धर्माधिकारी यांचे शुक्रवारी सातार्‍यात व्याख्यान ; जनता बँकेच्या मोफत अभ्यासिका,...

अविनाश धर्माधिकारी यांचे शुक्रवारी सातार्‍यात व्याख्यान ; जनता बँकेच्या मोफत अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा केंद्राच्या उदघाटनानिमित्त उपक्रम

साताराः सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी, सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या आणि नुकताच हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या जनता सहकारी बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख, ज्येष्ठ संचालक विनोद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जनता बँक अभ्यासिका आणि स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन शुक्रवार, दि. ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. यानिमित्त सायंकाळी ५.३० वाजता शाहू कलामंदिर येथे माजी सनदी अधिकारी, प्रसिध्द लेखक आणि चाणक्य मंडळ परिवाराचे संचालक श्री. अविनाश धर्माधिकारी यांचे मस्पर्धा परिक्षा – संधी आणि आव्हानेफ या विषयावर व्याख्यान होणार आहे, अशी माहिती जनता सहकारी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांनी दिली.
जनता सहकारी बँकेच्या कर्मचारी संघाचा आणि बँकेचा हा संयुक्त उपक्रम आहे. फक्त आर्थिक सक्षमता एवढाच निकष न ठेवता वेळोवेळी बँकेने सामाजिक योगदान दिले आहे. कोरोनाच्या संकट काळातही आयसोलेशन सेंटर बँकेने उभे केले होते. सातारा जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी तब्बल ११ मशिन देणगीदारांच्या सहकार्याने उपलब्ध केल्या होत्या. या मशिनमुळे तब्बल १ हजाराहून अधिक रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचवण्यात जनता बँकेने योगदान दिले आहे.
सातारा जिल्ह्यातील होतकरु आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत अभ्यास करण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी गेल्या एक वर्षापासून अभ्यासिका उभारण्याचे काम सुरु आहे. परिस्थिती आणि योग्य मार्गदर्शनाअभावी अनेक विद्यार्थ्याचे स्पर्धा परिक्षेत यश मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम करणारा हा उपक्रम आहे. या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या स्पर्धा परिक्षांचे मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. त्याशिवाय अभ्यासासाठी लागणारी सर्व पुस्तके उपलब्ध केली जाणार आहेत. तज्ञ आयपीएस, आयएएस अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. मुलांना स्वत:चे साहित्य ठेवण्यासाठी लॉकर सुविधा, पिण्यासाठी शुध्द पाण्याची सोय आणि मोफत वायफाय सुविधा दिली जाणार आहे. सर्व काही मोफत अथवा विनाशुल्क पध्दतीने एखाद्या आर्थिक संस्थेने उभारलेली ही पहिलीच अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र ठरणार आहे. स्पर्धा परिक्षा, बॅकींग आणि इतर महत्त्वाच्या परिक्षांसाठी येथून मार्गदर्शन मिळणार आहे.
अभ्यास केंद्राच्या उदघाटनाच्या निमित्ताने अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. सनदी सेवा सोडून चाणक्य मंडळच्या माध्यमातून अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी धर्माधिकारी यांनी घडवले आहेत. त्यांचे मार्गदर्शन सातारा जिल्ह्यातील तरुण पिढी आणि त्यांच्या पालकांना मिळावे यासाठी हे व्याख्यान ठेवण्यात आले आहे. त्याचा लाभ विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावा, असे आवाहन व्हाईस चेअरमन विजय बडेकर, संचालक मंडळ आणि कर्मचारी संघाने केले आहे..

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular