वडूज : ऐन लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून माढा लोकसभा मतदारसंघातून थेट भाजपाची उमेदवारी घेतली. त्यांच्या अकस्मिक राजीनाम्यानंतर अद्याप जिल्हाध्यक्ष पद रिक्त आहे. या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार ? व जिल्हाध्यक्ष पदाचा विना कोणाच्या गळ्यात येणार याकडे खटाव-माण सह जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
आज मितीला जेष्ठतेच्या निकषानुसार कोरेगांवचे अॅड. विजयराव कणसे, पाटण तालुक्यातील ढेबेवाडीचे हिंदुराव पाटील, खटाव तालुक्यातील वडूजचे अशोकराव गोडसे, पुसेगांवचे डॉ. सुरेश जाधव यांची नांवे चर्चेत आहेत.
यापैकी अॅड. कणसे यांनी जिल्हा काँग्रेस, प्रांतीक काँग्रेसचे सदस्य म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी कोरेगांव तालुकध्यक्ष पदही भूषविले आहे. कोरेगांव तालुक्यात सहकारी दुध संघाची निर्मिती करण्याबरोबर एकवेळ जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी पक्षाच्या गटनेते पदाचीही जबाबदारी समर्थपणे पेलली होती. या निमित्ताने त्यांचा जिल्ह्यातील बहुतांशी काँग्रेस कार्यकत्यांचा जवळून संबंध आला होता. याशिवाय त्यांनी कोरेगांव मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढविली होती. निवडणूकीमुळे कोरेगांवसह खटाव व सातारा तालुक्यातही त्यांचा संपर्क आला आहे. अत्यंत मितभाषी व सर्वांना बरोबर घेवून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. दुसरीकडे पाटण तालुक्यात शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई व राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर या दोन मात्तब्बर गटाच्या शक्ती विरोधात हिंदुराव पाटील अनेक वर्षे लढा देत आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी ढेबवाडी खोर्यात काँग्रेसचे अस्तित्व जिवंत ठेवले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून त्यांची ओळख आहे.
खटाव तालुक्यातून वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे व डॉ. सुरेश जाधव ही दोन नांवे चर्चेत आहेत. यापैकी अशोक आबांनी बाजर समिती सभापती पदाबरोबर अनेक वर्षे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद भूषविले आहे. त्याचबरोबर जिल्हा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचीही धुरा अनेक वर्षे संभाळली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी विद्ममान आमदार जयकुमार गोरे यांचे नेतृत्व झुगारुन वरिष्ठांच्या सल्यानुसार आघाडी धर्माची पाळणूक केली होती. तर डॉ. जाधव यांनी खटाव तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती पद भूषविले आहे. त्यांनीही एकवेळ विधानसभेची निवडणूक लढविली आहे. पुसेगांव येथील सेवागिरी देवस्थान व स्थानिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ ते काम करत आहेत.
अशी भलीमोठी यादी असली तरी निष्ठेच्या मुद्यावर गड्या आपला नानाच बरा असे म्हणणार्यांचीही संख्याही मोठी आहे. अश्या परस्थितीत नक्की कोणाची निवड होणार याकरीता लोकसभा निवडणूकीचा निकाल होण्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे. सद्या पक्षश्रेष्ठी पृथ्वीराज बाबांनी तुर्तास कार्यकारी अध्यक्ष नेमण्यासंदर्भात सुचक वक्तव्य केले आहे.
जिल्हा काँग्रेसचा विना कोणाच्या गळ्यात येणार ?
RELATED ARTICLES

