सातारा – कांदाटी खो-यातील रुग्णवाहिका प्रश्नी माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले असून. उपोषण स्थगित करताना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रश्न सोडवावा अशी मागणीही श्री. मोरे यांनी केली आहे.
माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सह्याद्री वाचवा मोहीम अंतर्गत सर्वसामान्यांना जनतेला लोकशाही पध्दतीने आंदोलन करुन न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या अशाच एका आंदोलनाला यश मिळाले असून कांदाटी खो-यातील 16 गावांसाठी रुग्णवाहिका मंजूर झाली आहे. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक सातारा यांनी सदरचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.
कांदाटी खो-यातील 16 गावांसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करुन द्यावी यासाठी श्री.मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 जुनपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. त्यावेळी याबाबत केंद्र व महाराष्ट्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन संबंधित विभागांने दिल्यानंतर श्री.मोरे यांनी बेमुदत उपोषण स्थगित केले होते. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा येथे 102ची एक रुग्णवाहिका, 108 ची एक रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे 102 ची एक रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे. तसेच 108 च्या आणखी रुग्णवाहिकांसाठी राज्यस्तरावर मागणी केल्याचे पत्र जिल्हा शल्यचिकित्सकांनी श्री. मोरे यांना दिले आहे. त्यामुळे श्री. मोरे यांनी केलेल्या आणखी एक आंदोलनाला यश मिळाले असून या रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेमुळे कांदाटी खो-यातील ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष घालण्याची मागणी
जिल्हयाचे सुपुत्र असणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जन्मभूमी कांदाटी खो-यातच आहे. भूमिपुत्र या नात्याने त्यांनी या भागात सुधारणा करण्यास सुरुवात केली असली तरी 108 ची रुग्णवाहिका तातडीने मिळण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष घालण्याची मागणी श्री. सुशांत मोरे यांनी आज समक्ष निवेदनाने केली आहे.