
कराड : येथे सुरु असलेल्या कराड शॉपिंग फेस्टिवल 2019 मध्ये खरेदीसाठी कराडकरांची झुंबड लागली होती. त्याचबरोबर फेस्टिवलला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह लोकप्रतीनिधींनी भेटी दिल्या. त्यामुळे शहर तसेच परिसरातील ग्राहकांना एका छताखाली खरेदी करण्याची संधी मिळाली.
रोटरी क्लब ऑफ कराड चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरॅक्ट आयोजित कराड शॉपिंग फेस्टिवल दि. 9 पासून ग्राहकांना खरेदीसाठी खुले झाले आहे. मंगळवार दि. 12 रोजी पर्यंत सुरु असलेल्या या फेस्टिवलमध्ये ग्राहकांना खरेदीचा मनमुराद आनंद लुटता येत असून त्याचबरोबर खरेदीवर आकर्षक सूट मिळत असल्याने खरेदीचा मोह कराडकरांना आवरता येईनासा झाला आहे. त्यामुळे प्रत्येक स्टॉलवरती ग्राहकांची एकच गर्दी पहावयास मिळत आहे.
चारचाकी गाड्या, इलेक्ट्रिक दुचाकी पासून टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, ब्रॅन्डेड कपडे, शूज, लेडीज वेअर आणि बरेच काही खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग चालू होती. तसेच ग्राहकांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खाद्यपदार्थ हि तयार होतेच. एकूणच घरगुती वस्तूंपासून ते चारचाकी गाड्यांपर्यंत एकाच ठिकाणी खरेदी करता आली. त्याचबरोबर फेस्टिवलला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह लोकप्रतीनिधींनी भेटी दिल्या.
कराड पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी पत्नी नगरसेविका विद्या पावसकर यांच्यासोबत फेस्टिवल भेट खरेदीचा आनंद लुटला तसेच महिला उद्योग समूहांनी बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांची प्रशंसा केली. फेस्टिवलमध्ये सुरु असलेल्या सुमधुर गीत गायनाने ग्राहकांना खरेदीबरोबर जुनी-नवी गाणी ऐकण्याचीहि संधी मिळाली.

