साताराः अमेरिकेतील नामांकित विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून पुढील शिक्षणासाठी जाणार्या केतन जोग याने आपले भावी शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून पुढील कार्यपध्दती आपल्या स्वतःच्या देशात अभिमानाने करावी हीच खर्या अर्थाने देशसेवा असेल असे उदगार माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त अॅड. विनायकराव आगाशे यांनी काढले.
सातारा येथील प्रभाकर परांजपे यांचे नातू केतन जोग याला नुकतीच इयत्ता बारावीनंतर अमेरिकेतील नामांकित अशा जगात सर्वात मोठया अशा 30 विद्यापीठांपैकी नामांकित न्युयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात प्रवेश व शिष्यवृत्ती मिळाली याबद्दल त्याचा विशेष सत्कार सातारा येथे करण्यात आला याप्रसंगी आगाशे यांनी वरील उदगार काढले.
सत्कार सोहळयात केतनचे वडील अनंत जोग, आई हेमांगी जोग, आजोबा प्रभाकर परांजपे, भास्कर परांजपे, सौ. विद्या आगाशे, डॉ. श्रीराम परांजपे, बळीराम इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
केतन जोग याला शुभेच्छा देण्यासाठी सातारा येथील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या कलावाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणेही उपस्थित होते. यावेळी डॉ. पाटणे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, केतन जोग सारखे अनेक विद्यार्थी हे राष्ट्राचे खरे वैभव आहेत. हा सत्कार ज्ञानात्मक गुणवत्तेचा गौरव आहे. कठीण आव्हाने पेलताना केतनने संस्कार व संस्कृतीचे जतन करावे. कुटूंबियांनी दिलेली शिदोरी ही त्याला ऊर्जा देत राहील.
समारंभाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक सौ. विद्या आगाशे यांनी केले. यावेळी केतनचे कौतूक करताना त्या म्हणाल्या की, त्याच्या आईवडीलांनी त्यांचे छंद व आवडीनिवडी लक्षात घेत त्याला संपूर्ण सहकार्य केले. जगातील नामांकित विद्यापीठात त्याची निवडही सर्व सातारकरांना सार्थ अभिमान व आनंद देणारी आहे. याप्रसंगी बळीराम उर्फ आण्णा इंगळे यांनी केतन व अनंत जोग यांचा फेटा बांधून सत्कार केला. तसेच आगाशे, परांजपे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितांनी केतन याचे कौतूक करून त्याला भेटवस्तू प्रदान केल्या.
समारंभास रोहन ढवळे, सौ. ताटके यांचेसह सातारा शहरातील परांजपे व आगाशे कुटूंबियांचे हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.
केतन जोगने अमेरिकेतील शिक्षण पूर्ण करून भविष्यात देशसेवा करावी : अॅड. विनायकराव आगाशे
RELATED ARTICLES