Wednesday, January 28, 2026
Homeठळक घडामोडीकिसन वीर महाविद्यालयात रंगला देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

किसन वीर महाविद्यालयात रंगला देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

सातारा:  सातारा येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना तसेच कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यां व समाजात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करणे व संविधानातील लोकशाहीची मूल्ये रुजवण्याच्या उद्देशाने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन जाधव, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख कॅप्टन डॉ. समीर पवार यांची उपस्थिती होती. डॉ. मंजुषा इंगवले व प्रा. डॉ. अंबादास सकट यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले. सदर कार्यक्रमातून देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात प्राणाचे बलिदान देणाऱ्या थोर महात्म्यांना शब्दरूपी आदरांजली वाहण्यात आली. भारतीय संविधानाचे महत्व विशद करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदी महामानव व कर्तबगार महिलांच्या कार्याचा उद्घोष करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या ‘जहा डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसेरा! वो भारत देश है मेरा!’ या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमात रंगत भरली. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे यांच्या ‘करितो वंदन भारत मातेला’ या गीताने उपस्थितांची मने जिंकली. सहा. प्रा. सुमती कांबळे यांनी आपल्या सुरेल आवाजात ‘शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला दहा दिशांच्या हृदयामधूनी अरुणोदय झाला.’ हे गीत सादर केले. महाविद्यालयाचा विद्यार्थी व उदयोन्मुख शाहीर श्री. राकेश लगस याच्या ‘अखंड हिंदुस्तान आमुचा, अखंड हिंदुस्तान’ या गीतास उपस्थितांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. वंदे मातरम! दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए! तेरी मिट्टी मे मिल जावा! इतणी है आरजू! आदी देशभक्तिपर गीतांनी परिसर दुमदुमून निघाला. सदर कार्यक्रमात श्री. जितेंद्र चौगुले, श्री. अनिल लाखे, कु. भक्ती वायदंडे यांनी देखिल देशभक्तिपर गीतांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण केले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी सहा देशभक्तीपर गीते सादर करत देशप्रेम व राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक डॉ. मंजुषा इंगवले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular