Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीकिसन वीरकारखान्यावर बायोकंपोस्ट खतविक्रीस प्रारंभ

किसन वीरकारखान्यावर बायोकंपोस्ट खतविक्रीस प्रारंभ

भुईंज : किसन वीर कारखाना कार्यस्थळावर कारखाना व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांचे पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी बायोकंपोस्ट (बायोइनरिच ऑरगॅनिक मॅन्युअर) या नवीन खत निर्मीतीस प्रारंभ केला आहे. या खत विक्रीचा शुभारंभ कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले आणि नंदकुमार निकम यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी मदनराव विलासराव जाधव, संभाजी परबती कदम, नवनाथ बबन डिगे, संतोष परशुराम कदम यांना देऊन करण्यात आला.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या चंद्रमौलेश्‍वर मंदिरालगतच्या परिसरात बायोकंपोस्ट (बायोइनरिच ऑरगॅनिक मॅन्युअर) खत निर्मितीस प्रारंभ केला आहे. बायोकंपोस्ट एक प्रकारचे सेंद्रीय खत असून पिकास आवश्यक असणारे नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, झिंक, फेरस, सिलिका इत्यादी प्रकारची अन्नद्रव्ये अधिक प्रभावी व पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार उपलब्ध करून देणार्‍या अशा 25 प्रकारच्या जीवाणुंचा तसेच जमिनीतून पसरणार्‍या बुरशीजन्य रोगास प्रतिबंधात्मक म्हणुन काम करणार्‍या ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा यामध्ये समावेश आहे. ऊस, हळद, आले व अन्य पिकांच्या वाढीसाठी हे खत अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या खताच्या वापरामुळे जमीनीतील कार्बन नायट्रोजनचे गुणोत्तर प्रमाण स्थिर राहते, तसेच अविद्राव्य खते व जादा झालेले क्षार विरघळण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. या बायोकंपोस्ट खतामधील जीवाणुंमुळे जमिनी क्षारपड व नापीक होण्यापासून वाचतात. बायोकंपोस्ट खताच्या वापरामुळे रासायनिक खतांच्या वापरामध्ये 20 ते 40 टक्यापर्यंत बचत होते. पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते.किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी किसन वीर कारखान्यावर उत्पादीत झालेले बायोकंपोस्ट हे नवीन सेंद्रीय खत वाजवी दरात शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे सांगुन जास्तीत जास्त कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांनी या सेंद्रीय खताचा पिक उत्पादनवाढीसाठी वापर करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहीतीसाठी कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांनी कारखान्याच्या ऊसविकास व शेती विभागाशी संपर्क साधावा.
यावेळी कार्यक्रमास हणंमतराव गायकवाड, दिपक चिकणे, कारखान्याचे इन्चार्ज ऊसविकास अधिकारी अशोक ढमाळ, हॉर्टीकल्चर इन्चार्ज विशाल सांवत, पी.पी. भोसले, अक्षय बाबर आणि वसंत पिसाळ यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular