खंडाळा : चार वर्षांपूर्वी गावातील काही मुलं भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्याच्या उन्हाळी कुस्ती शिबिरासाठी गेली. त्यातील दोघांनी राष्ट्रीय, तिघांनी विभागीय तर दोघांनी राज्य पातळीवर धडक मारली. पोरांच्या मनगटात जोर असल्याची जाणीव झाली आणि याच जाणिवेतून जास्तीत जास्त मुलांना गावातच असे प्रशिक्षण द्यावे या हेतूने खंडाळा तालुक्यातील छोट्याशा कान्हवडी गावात उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सुरु झालं. किसन वीर कारखान्यावर रुजलेल्या या उपक्रमाच्या वृक्षाचं बीज अशा तर्हेने कान्हवडीत अंकुरलं आणि यंदाच्या पहिल्याच वर्षी तब्बल 50 मुलं आखाड्यात घाम गाळू लागल्याने ग्रामस्थांचा उर अभिमानानं दाटून आला. ग्रामस्थांच्या आग्रहावरुन या शिबिराला भेट देवून आनंदलेल्या किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी या शिबिरासाठी कुस्तीचे मॅट उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.
किसन वीर कारखान्याच्या राजर्षि शाहू कुस्ती केंद्रात दरवर्षी उन्हाळी सुट्टीत निवासी कुस्ती प्रशिक्षण शिबिर आयोजन केले जाते. सन 2016 साली या शिबिरात कान्हवडीतील काही मुलं सहभागी झाली होती. यातील एकाने राष्ट्रीय पातळीवर विजेतेपत, एकाने राष्ट्रीय पातळीवर उपविजेतेपद, तिघांनी विभागीय पातळीवर आणि दोघांनी राज्य पातळीवर सुवर्णपदक प्राप्त केले. कान्हवडीतील या मुलांची कुस्तीच्या क्षेत्रातील ही सुवर्णकामगिरी सार्या गावाला थक्क करणारी आणि आनंदीत करणारी होती. सर्व परिसरातच कुस्तीप्रेमाचं भरतं आलं.
किसन वीर कारखान्याच्या शिबिरामुळे गावातील या मुलांची धमक लक्षात आली असली तरी तेथील शिबिरात सर्वांनाच पाठवणे शक्य नसल्याने गावातच असे उन्हाळी शिबिर आयोजित करण्याचा निर्धार केला आणि यंदाच्या वर्षी तो अंमलातही आणला. हनुमान आखाड्याने सर्वांच्या सहकार्याने पुढाकार घेवून आयोजित केलेल्या या शिबिरात तब्बल 50 मुलं सहभागी झाली. 10 वर्षांपासून 16 वर्षांपर्यंतच्या सहभागी मुलांना कुस्तीसोबत शारीरीक प्रशिक्षण, योगाचेही प्रशिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांना कोच रविंद्र मरगजे तसेच राष्ट्रीय व राज्य विजेते ओंकार मरगजे, गौरव शेेटे, अक्षय मरगजे, चंदन मरगजे तसेच कुस्ती या खेळाच्या बळावर पोलिस दलात दाखल झालेले नितीन मरगजे व विनोद मरगजे प्रशिक्षण देत आहेत.
कोणत्या शब्दांत कौतुक करावे?
कान्हवडी ग्रामस्थांच्या आग्रहानंतर मदन भोसले यांनी या शिबिरास भेट दिली. किसन वीर कारखान्यावर राबवलेल्या उपक्रमापासून प्रेरणा घेवून सुरु करण्यात आलेलं शिस्तबद्ध शिबिर पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. विश्वास मरगजे जेव्हा, दादा तुमच्यापासून प्रेरणा घेवून हे सुरु झालं आहे, असे म्हणाले तेव्हा भोसले यांनाही काय बोलावे सुचेना. कोणत्या शब्दांत तुमचे कौतुक करावे? असा प्रश्न करुन पुढील वर्षीचे शिबिर मॅटवर होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. बराच वेळ ते शिबिरार्थींच्यात रमले. यावेळी सुरेश मरगजे, आत्माराम मरगजे, अभिजित मरगजे, रविंद्र मगरजे, सुनिल मरगजे, नवनाथ धनवडे आदी ग्रामस्थ पालक उपस्थित होते.
किसनवीरच्या उपक्रमाचं बीज कान्हवडीत अंकुरलं
RELATED ARTICLES