Thursday, April 24, 2025
Homeसातारा जिल्हाकराड17 वे यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन...

17 वे यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ; कृषी प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

सातारा दि. 22 : कराड येथे आयोजित 17 वे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन तसेच जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 25 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट, बैल बाजार येथे दि. 24 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

दरवर्षी माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेती उत्पन्न बाजार समिती कराड, जिल्हा परिषद, सातारा, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. गेली 2 वर्षे कोरोनामुळे हे प्रदर्शन आयोजित करता आले नाही. मात्र यावर्षी कोरोना निर्बंध हटल्यामुळे हे प्रदर्शन पुन:श्च एकदा आयोजित केले जात आहे. यंदाचे या प्रदर्शनाचे 17 वे वर्ष आहे.

लहरी हवामानामुळे बसणारा फटका व हातात आलेले पीक वाचवितांना शेतकऱ्यांची होणारी दमछाक, याचा विचार करता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आच्छादित शेतीकडे वळावे यासाठी यावर्षी संरक्षित शेती ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. त्यानुसार प्रदर्शनामध्ये विविध प्रात्याक्षिके, प्रारुप व शासकीय योजनांची माहिती सादर केली जाणार आहे.

या प्रदर्शनामध्ये शंभर विविध शासकीय उपक्रम व शेतकऱ्यांसाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यामध्ये सिताफळ प्रक्रिया, नाचणी, खपली गहू, शेवया, आवळा, सेंद्रिय गूळ, सेंद्रिय शेती, जवस, बेदाणा, हळद, प्रक्रिया केलेले आले, ज्वारी, तांदूळ, परदेशी भाजीपाला, दुग्धप्रक्रिया, राजगिरा, कडधान्ये, संत्रा यांचा समावेश आहे. तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित तीनशे स्टॉल असे एकूण चारशे स्टॉल या प्रदर्शनात असणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या कृषी विकास विभागामार्फत विविध पिकांच्या स्पर्धा आयोजित केल्या असून दि. 24 नोव्हेंबर रोजी ऊस पीक स्पर्धा, दि.25 नोव्हेंबर रोजी केळी घड स्पर्धा, दि.26 नोव्हेंबर रोजी विविध फुले स्पर्धा, दि. 27 नोव्हेंबर रोजी विविध फळे स्पर्धा व दि.28 नोव्हेंबर रोजी भाजीपाला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु.3001/-, द्वितीय पारितोषिक रु.2101/-, तृतीय पारितोषिक रु. 1501/- आहे. या स्पर्धेसाठी कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती, कराड यांच्याशी संपर्क साधावा.

या प्रदर्शनामध्ये ड्रोन फवारणी, सोलर पंप, आच्छादित शेती, स्वयंचलित सूक्ष्म सिंचन, व्हर्टिकल फार्मिंग, बिन मातीची शेती (हायड्रोफोनिक्स), जैवइंधन आदींची प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत. राज्य शासनाच्यावतीने होणाऱ्या जिल्हा कृषी महोत्सव योजनेतील राज्यातील पहिला जिल्हा कृषी महोत्सव देखील या कृषी प्रदर्शनादरम्यान आयोजित होत आहे.

या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी प्रत्येक गावातून शेतकरी सहलीचे आयोजन होणार आहे. यावर्षी लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुपक्षी प्रदर्शनामधून गाय, म्हैस स्पर्धा वगळण्यात आली आहे. मात्र शेळी, मेंढी प्रदर्शन व श्वान प्रदर्शन नेहमीप्रमाणे आयोजित केले जाणार आहे.

कृषी प्रदर्शन यशस्वी होणेसाठी सर्व विभागांनी सक्रीय सहभाग घ्यावा तसेच कृषी, ग्रामीण विकास, पशुसंवर्धन विभाग व अंगीकृत उपक्रम यांनी शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जास्तीत जास्त शेतकऱ्ंयापर्यंत पोहोचवाव्यात अशा सूचना सर्व संबंधित विभागांना जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी दिल्या आहेत.

00000

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular