शिवनगर: येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा वजनकाटा आपल्या अचूकतेमुळे नेहमीच धर्मकाटा म्हणून ओळखला जातो. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार शासकीय भरारी पथकाने नुकतीच कारखान्याच्या वजनकाट्याची पाहणी केली. त्यावेळी भरारी पथकाच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी प्रत्येकवेळी कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे कृष्णाच्या वजनकाट्याने धर्मकाटा ही ओळख अबाधित राखली आहे.
सातारा जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची पाहणी करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी काढले आहेत.
यानुसार निवासी नायब तहसीलदार अजित कुर्हाडे, वैद्यमापनशास्त्र विभागाचे निरिक्षक ल. उ. कुटे, पुरवठा निरीक्षक गोपाळ वसु, पुरवठा निरीक्षक विलास गभाले, शेणोलीचे मंडल अधिकारी श्री. राठोड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे साजिद मुल्ला, शेतकरी संघटनेचे विश्वास जाधव, गावकामगार तलाठी रेठरे बुद्रुकचे एस. एस. फिरंगे यांनी संयुक्तपणे कारखाना कार्यस्थळाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या 20 किलो क्षमतेच्या एकूण 6,020 किलो वजनाच्या प्रमाणित वजनाने तपासणी करण्यात आली. तसेच ऊसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन करून, गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी परत इलेक्ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलवण्यात आल्या.
या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले. तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या मोठ्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे होत असल्याचे निदर्शनास आल्याने कृष्णा कारखान्याचा वजनकाटा निर्दोष व अचूक असल्याचा शेरा पथकाने दिला.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ई.डी.पी. मॅनेजर अवधूत रेणावीकर, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते, ए. डी. पाटील, जी. बी. मोहिते आदी उपस्थित होते.