सातारा दि. १६ – सातारच्या दाभोळकर कुटुंबाच्या प्रा. कुंदा (अंबु) दाभोळकर स्मृती केंद्राच्या वतीने लक्ष्मीबाई पाटील विद्यार्थिनी वस्तीगृहासाठी म्हणून रयत शिक्षण संस्थेकडे अकरा लाख रुपयाची कायमस्वरूपी ठेव ठेवण्यात आलेली आहे. तसेच यंदा एक लाख रुपये हे विद्यार्थिनीच्या दैनंदिन उपयोगासाठी म्हणून देण्यात आलेले आहेत. हा सहयोग निधी अतिशय मोलाचा आहे. त्यांचे हे काम संस्था कधीही विसरणार नाही असे रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन व संघटक डॉ अनिल पाटील यांनी सांगितले.
रयत च्या लक्ष्मीबाई पाटील विद्यार्थीनी वसतीगृहाला प्रा कुंदा (अंबू) दाभोळकर स्मृती केंद्रातर्फे निधी प्रदान करण्याचा कार्यक्रम वसतिगृहात डॉ.अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. समता दाभोळकर व डॉ दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते हा निधी प्रदान करण्यात आला. यावेळी मानसोपचार तज्ञ डॉ. प्रसन्न दाभोळकर , अभिजीत दाभोळकर , विजय मांडके , सुनील बागल आदी उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुली व वंचित घटकातील मुली यांच्यासाठी सुरू असलेल्या व शासनाचे कोणतेही अनुदान नसलेल्या या विद्यार्थिनी वस्तीगृहाला दिलेला हा सहयोग निधी आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे असे सांगून डॉ अनिल पाटील यांनी संस्थेच्या वतीने या विद्यार्थिनी वस्तीगृहातील मुलींसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
आम्ही दिलेला हा सहयोग निधी योग्य ठिकाणी दिलेला आहे याचा आम्हाला आनंद आहे असे सांगून डॉ दत्तप्रसाद दाभोळकर म्हणाले की या मुलींची शिस्त व येथील वातावरण अतिशय चांगले आहे.
मानसोपचार तज्ञ डॉ. प्रसन्न दाभोळकर यांनी लक्ष्मीबाई पाटील उर्फ वहिनीसाहेब यांच्या त्यागाची आठवण करून दिली आणि हा त्यागच मोठे तत्त्वज्ञान सांगून जातो असे ते म्हणाले.
प्रा कुंदा (अंबू )दाभोळकर स्मृती केंद्राचा सहयोग निधी देण्याचा उपक्रम पथदर्शक आहे. आणि सातारा शहरातील अनेक व्यक्ती आणि संस्था या वस्तीगृहाला सहयोग निधी देण्यासाठी पुढे येतील असा विश्वास विजय मांडके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
स्वागत व प्रास्ताविक वसतीगृह प्रमुख सौ शिंदे एस. एस. यांनी केले. आभार सविता शिंदे यांनी मानले
साक्षी शेरे व साक्षी कासार या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. यावेळी वैष्णवी रेडेकर या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थीनींना स्नेहभोजन देण्यात आले.
कार्यक्रमास प्रेमा ग्रामोपाध्ये , सुधाकर शिंदे , अंजना गुजर व लोंढे हे उपस्थित होते.