सातारा : पद्मश्री लक्ष्मण माने यांचे सामाजिक, राजकीय जीवन उध्वस्त करण्यासाठी त्याच्याच शाळेतील सहा अडाणी महिलांना हाताशी धरुन त्याच शाळेतील शिक्षक, सलीमा मुल्ला जमादार, अस्लम जमादार, विजय कदम, आनंद देशमुख, यांनी लक्ष्मण माने यांना बलात्काराच्या कटात हेतुपुरस्कर व जाणीवपूर्वक गोवले, न्यायालयाने लक्ष्मण माने यांची पुराव्याअभावी मुक्तता केलेली नाही, तर त्यांना काहीजणांनी कटात अडकवले असा शेरा मारुन त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. अशी माहिती लक्ष्मण माने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच समोर नावे आलेल्या शिक्षकांचे मागेही काही राजकीय व सामाजिक व्यक्ती होत्या असा आरोप लक्ष्मण माने यांनी केला. यामधील काहीजणांवर सातारा न्यायालयात प्रत्येकी 10 लाख रुपयांचे अब्रु नकसानीचे दावे दाखल केले आहेत, काहीजणांवर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ज्या महिलांवर बलात्कार झाला असा आरोप करण्यात आला होता त्यासंबंधाने न्यायालयाने नमुद केले आहे की या एफ. आय. आर. सुध्दा त्यांच्या स्वत:च्या नसून त्याही इतरांनी पढवून तयार केलेल्या आहेत. त्यामागे इतर मास्टरमाईंड असल्याचे नमूद केले आहे. मार्च 2013 ते 19 ऑक्टोबर 2016 या कालावधीत हा खटला सातारा न्यायालयात सुरु होता. या कालावधीत माझे निदोषत्व सिध्द होईपर्यंत मी कोणत्याही राजकीय सामाजिक कार्यात सहभागी झालो नाही. मी कायद्याचा सन्मान करतो. माझे निदोषत्व पुराव्या अभावी झालेले नाही तर मला कटात अडकवल्याचेही नमुद केले आहे. मी या सर्व आरोपातून निर्दोष मुक्त झालो आहे. सनातन प्रभात मध्ये माझ्याविरोधात खोटे वृत्त प्रसिध्द करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत मी पोलिस ठाण्यात तक्रार देणार आहे. प्रतिगामी लोकांकडून माझ्या जीवास धोका आहे.
माझ्या या वर्तनातून मी भारतीय राज्यघटनेचा न्यायालयाचा सन्मान करतो ही मी वर्तणूकीतून कृती दाखवली आहे. त्यामुळे सनातन प्रभात यांनी बलात्कारी लक्ष्मण माने असे म्हणून माझी आजही बदनामी करण्याचे षडयंत्र सुरु ठेवले आहे. कायद्याने निर्दोष मुक्तता होवूनही ही मंडळी कायद्याला न मानता मला जाणीवपुर्वक बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहे. भिडे व एकबोटेंनी त्यांचा सहभाग भिमा कोरेगाव दंगलीत होता किंवा नव्हता हे न्यायालयात सिध्द करावे असे माझे त्यांना आव्हान आहे. या देशात कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

