पाटण:- प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत गुरुवारी गर्दी जमविणाऱ्या व वेळेचे बंधन न पाळणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली. यावेळी त्यांनी पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांना खडे बोल सुनावत नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढले. नंगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे पाटण शहरातील गरीब व स्थानिक व्यापाराच्या दुकानावर कारवाई झाली. मात्र याच दुकानासमोर अनेक परप्रांतीयांची दुकाने शासनाचे नियम धाब्यावर बसवून आतल्या बाजूने दुकानात गिराईकांची खचाखच गर्दी करत आहेत. बाहेरून दुकानाचे शटर पूर्ण बंद असले तरी कामगाराला दरवाज्यात उभे करून गिराईकाला आत घेतले जात आहे. यामुळे स्थानिक व गरीब व्यापारांच्यावर अन्याय होत असल्याचे चित्र सध्यातरी पाटण मधे दिसत आहे. प्रशासनाच्या नजरेत धूळफेक करून आतल्या बाजूने दुकाने सुरु ठेवणाऱ्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी नागरीकांच्यातून होत आहे.
पाटण शहर व तालुक्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश टोम्पे व त्यांची टीम तसेच पोलीस उपअधीक्षक अशोकराव थोरात, पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे, पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आपले कर्तव्य बजावताना दिवसरात्र राबत आहेत. आपल्या कर्तव्यांसोबत त्यांना जादा कामे ही करावी लागत आहेत. तरीही तालुक्यातील बहुतांश जनता बेजबाबदार वागत आहे. त्यातच काही जबाबदार अधिकारी व पदाधिकारी जादा कामे तर सोडाच पण आपली कर्तव्ये ही बजावत नसल्याने सुज्ञ जनता व अधिकारी चिंतीत आहेत. सर्व घटकांनी जबाबदारी स्वीकारून काम केले तरच आपण या महामारीला हरविण्यात यशस्वी होणार आहोत.
यापूर्वी पोलीस उपअधीक्षक अशोकराव थोरात यांनी काही दिवसांपूर्वी पाटणचा बाजार स्वतः जबाबदारीने बंद केला होता. त्यावेळीही नगरपंचायतीचा ढिसाळ कारभार दिसून आला होता. गुरुवारी पुन्हा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे पुन्हा आपले सहकारी पाटणचे तलाठी जयेश शिरोडे, एस.जे. झांगडे आदी यांना घेऊन रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी जमलेली गर्दी त्यांनी हटवली. नियमबाह्य सुरु असलेल्या दुकानावर त्यांनी डायरेक्ट कारवाई केली. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांना चांगलेच खडे बोल सुनावले.
त्यामुळे नगरपंचायत फक्त कर वसूल करण्यासाठी आहे का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.