Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीपाटण विधानसभा मतदार संघात ५६ टक्के मतदान.

पाटण विधानसभा मतदार संघात ५६ टक्के मतदान.

पाटण:- सातारा लोकसभा निवडणुकीसाठी पाटण  तालुक्यात  सुमारे ५६ टक्के च्या दरम्यान मतदान झाले. सकाळ वेळी पाटण तालुक्यातील २२ ठिकाणी बॅलेट युनिट, १० ठिकाणी कंट्रोल युनिट व २१ ठिकाणी व्ही. व्ही. पॅड मशिनमध्ये बिघाड निर्माण झाला होता. तेथे तात्काळ राखीव नवीन यंत्रे दिल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. तालुक्यात सर्वच ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि डि.वाय.एस.पी. अगंध जाधवर यांनी दिली.

मंगळवार दि. २३ रोजी सकाळी ७ वाजता प्रत्यक्षपणे मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मतदारांनी गर्दी केली होती. यामध्ये महिलांसह ज्येष्ठांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत होता. सकाळी ११ पर्यंत पाटण तालुक्यात सरासरी २१.२९ टक्के मतदान झाले होते. ११ वाजल्यानंतर मात्र प्रचंड उन्हाचा तडाखा लागत असल्याने दुपारी ४ वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी पहावयास मिळत होती. चार नंतर उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर मतदारांनी घराबाहेर पडून मतदान केले. यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ५६ हजार ८१५ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. दिवस भरात मात्र नव मतदार युवक – युवती मतदारांनी मोठ्या उत्साहाने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केले.
एकूण २ लाख ९७ हजार ७८१ मतदारांपैकी ७६ हजार ६६६ पुरुष मतदारांनी मतदान केले. तर ८० हजार १४९ महिला मतदारांनी मतदान केले. पुरुषांपैक्षा महिला मतदारांनी मतदान करण्यासाठी आघाडी घेतली.

सकाळच्या सुमारास पाटण तालुक्यातील दुर्गम ठिकाणी असलेल्या पांढरेपाणी, बोंद्री व इतर ठिकाणी मशिनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने मतदानासाठी आलेल्या मतदारांना काही वेळ ताटकळत रांगेत उभे रहावे लागले होते. तसेच मतदानादिवशी ढेबेवाडी येथील आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार शंभूराज देसाई , सौ. स्मितादेवी देसाई यांनी मरळी येथे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर, सौ. यशस्विनीदेवी पाटणकर, अर्जूनसिंह पाटणकर यांनी पाटण येथे तर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील व डॉ. प्राची पाटील यांनी मंद्रुळकोळे येथे मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

यावर्षी प्रथमच निवडणूक आयोगाकडून सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात   केंद्र क्र. १३९ वर सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. केंद्रात सजावट करून केंद्राबाहेर मतदारांच्या स्वागतासाठी कमान उभारून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. या केंद्रावर क्षेत्रिय अधिकारी शामली कात्रे, केंद्राध्यक्षा विजया नांगरे, मतदान अधिकारी शैला कदम, शोभा लोणी, शिलादेवी पाटणकर, संगीता डुबे, पोलीस हवालदार अश्विनी घोरपडे, अंगणवाडी सेविका नेहा गायकवाड, स्वाती पवार, आशा सेविका उमा महाडीक आदी महिला कार्यरत होत्या. त्यांनी यशस्विपणे मतदान प्रक्रिया पार पाडली.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रामहरी भोसले, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, नायब तहसीलदार डी. एल. लोंढे, बजरंग चौगुले, शकील मुल्ला, मंडलाधिकारी आनंदा सपकाळ, हणमंत शेजवळ, निलेश येडपलवार, राहूल कंदारे, महादेव अष्टेकर, सागर ठोंबरे, आर. एम. चव्हाण, अजमुद्दीन मुलाणी यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, महसूल कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. तर मतदानाच्यादिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्याचबरोबर मतदान शांततेत पार पडण्यासाठी पाटण तालुक्यात उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधववर, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चौकट:-
मतदानाचा टक्का घसरला.
मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पाटण विधानसभा मतदारसंघातून ५८ ते ६० टक्के च्या दरम्यान मतदान झाले होते. मात्र चालू २०१९ लोकसभा निवडणुकीत हि टक्केवारी घसरुन ५६ टक्के वर आली. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छ. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेना- भाजप युती कडून पाटण तालुक्यातील स्थानिक उमेदवार नरेंद्र पाटील यांची उमेदवारी होती. या पाश्र्वभूमीवर पाटण तालुक्यातून उस्फुर्त मतदान होईल असे वाटले होते. मात्र मागील निवडणूकी पेक्षा मतदानाचा टक्का घसरल्याने उमेदवारांच्यां भवितव्याचा अंदाज सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष २३ मे रोजी होणाऱ्या निकालावर लागले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular