Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीमाढ्याचा तिढा सुटला; माढ्यात संजयमामा विरूद्ध रणजितसिंह सामना

माढ्याचा तिढा सुटला; माढ्यात संजयमामा विरूद्ध रणजितसिंह सामना

फलटण : सध्याच्या घडीला माढा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. या पूर्वी राष्ट्रवादीने येथून सोलापूर जि.प अध्यक्ष संजयमामा शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे माढ्याचा तिढा आता सुटला असून रणजितसिंह ना. निंबाळकर विरूध्द संजयमामा शिंदे अशी लढत होणार आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे स्थानिक माध्यमांशी बोलताना रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ते उद्या मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेश अध्यक्ष खा रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाषराव देशमुख,सोलापुरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या उपस्थितिति दुपारी 1 वा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या लढतीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार व मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकेकाळचे जिवलग मित्र असणारे हे दोघे लोकसभेच्या रणांगणात एकमेकांविरोधात लढणार आहे. यामध्ये आता कोण बाजी मारणार? याच्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.
रणजितसिंह ना. निंबाळकर हे काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष होते. त्यांनी स्थानिक प्रश्नाला हात घालून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सापत्न वागणूक दिली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात आघाडी धर्म पाळता येणार नसल्याचे सांगत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. रणजितसिंह यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री त्यांच्या उमेदवारीची घोषणा करणार आहेत.
यामुळे बराच काळ चर्चेत असलेल्या माढा लोकसभेचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. माढामधून आता राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी थेट लढत होणार आहे. तर बहुचर्चित बहुजन वंचित आघाडीने या पूर्वीच आपला उमेदवार जाहीर केला असून ते कोणाला तारक व कोणाला मारक ठरणार हा निकालच सांगेल असेच बोलले जात आहे.
दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटील यांची दावेदारी मानली जात होती मात्र त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचा पत्ता कट झाला. संजय शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असून राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे भाऊ आहेत. तसेच सहाही जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर मंडळी कोणती व्युहरचना आखतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे. भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता रणजितसिंह ना. निंबाळकर यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. यामुळे दोन रणजितसिंह भाजपाच्या नवीन मुशीत गेल्याने माढ्याचे रण जिंकणार का? याचीच चर्चा सुरू आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular