Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीसार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीत वीजदर ; अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीत वीजदर ; अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

सातारा : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह 4 रुपये 38 पैेसे प्रतियुनिट या वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 20 पैसे अधिक 1 रुपया 18 पैसे वहन (व्हिलींग) आकार तसेच इंधन अधिभार असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त 13 पैशांनी अधिक आहे तर वाणिज्यिक दरापेक्षा 2 रुपये 90 पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आला आहे.
सार्वजनिक गणेश उत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी व अर्थिंगचीही खबरदारी घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्यता असते.
तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी, कार्यकर्त्यांनी 24 तास सुरु असणारे टोल फ्री क्रमांक 1912, 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत.
गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular