Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीलोणंद येथील महापारेषणच्या उपकेंद्रातील आग नियंत्रणात ; महाबळेश्वर, वाई, फलटण तालुक्यांतील वीजपुरवठा पूर्ववत....

लोणंद येथील महापारेषणच्या उपकेंद्रातील आग नियंत्रणात ; महाबळेश्वर, वाई, फलटण तालुक्यांतील वीजपुरवठा पूर्ववत….

सातारा, दि. 15 एप्रिल 2020 : लोणंद (ता. खंडाळा) येथील महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरला बुधवारी (दि. 15) दुपारी 12 वाजता आग लागल्यामुळे वाई, फलटण, महाबळेश्वर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये सर्व वर्गवारीतील 1 लाख 93 हजार वीजग्राहकांचा खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून दीड ते साडेतीन तासांत पूर्ववत करण्यात आला.

दरम्यान, लोणंद शहरासह नजिकच्या काही गावांमध्ये पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर तांत्रिक कामे सुरु असून या भागांतील 12 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी, की लोणंद येथे महापारेषण कंपनीचे 220 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातून 132 केव्ही वीजवाहिनींद्वारे फलटण, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, लोणंद शहर व ग्रामीण भागात वीजपुरवठा केला जातो. आज दुपारी 12 वाजता या उपकेंद्रातील 50 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली. आगीचे लोळ उठल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून उपकेंद्रातून सुरु असलेला संपूर्ण वीजपुरवठा बंद करण्यात आला. परिणामी महावितरणचे उपकेंद्र बंद पडल्याने फलटण, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, लोणंद शहर आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला. महापारेषणचे कर्मचारी तसेच लोणंद, फलटण, भुईंज व निरा येथील अग्निशामक दलांनी अथक प्रयत्न करीत सुमारे तीन तासांत उपकेंद्रातील आग विझवली. मात्र या आगीमुळे पॉवर ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झाले.

मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महावितरणच्या अभियंत्यांनी तातडीने पर्यायी व्यवस्थेमधून वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले. यामध्ये वालचंदनगर अतिउच्चदाब उपकेंद्रातून पर्यायी व्यवस्थेद्वारे फलटण शहर व ग्रामीण भागातील वीजपुरवठा केवळ दीड तासांमध्ये सुरु करण्यात आला. मात्र वाई, महाबळेश्वर, पाचगणी व लोणंद परिसरासाठी पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध नसल्याने आग लागलेल्या लोणंद उपकेंद्रातच तांत्रिक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. यामध्ये उपकेंद्राची तांत्रिक तपासणी व काही चाचण्या घेतल्यानंतर दुपारी 3.15 वाजता दुसऱ्या पॉवर ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. त्याद्वारे वाई येथील महापारेषणच्या 132 अतिउच्चदाब उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरु झाल्याने महावितरणकडून दुपारी 3.30 पर्यंत वाई, पाचगणी, महाबळेश्वर शहरांसह ग्रामीण भागातील संपूर्ण वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

दरम्यान आगीत जळालेल्या पॉवर ट्रान्सफॉर्मरवरून वीजपुरवठा असल्याने लोणंद शहर व नजिकच्या हिंगणगाव, तरडगाव, बोरी, मुखेड, सालपे आदी गावांमध्ये पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था होऊ शकली नाही. त्यामुळे निरा येथील महावितरणच्या 33/11 केव्ही उपकेंद्राद्वारे लोणंदसह ग्रामीण भागातील वीजपुरवठा पर्यायी स्वरुपात सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी 100 मीटर नवीन वीजवाहिनी टाकण्यात येत असून सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत या भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular