सातारा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे गेल्या 23 मार्चपासून महावितरणने वीजबिलांची छपाई व वितरण बंद केले आहे. मात्र महावितरणने मोबाईल अॅप, वेबसाईट व ‘एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिल मिळविणे व ते ‘ऑनलाईन’ भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
बारामती परिमंडल अंतर्गत सातारा, सोलापूर व बारामती, दौंड, शिरुर, इंदापूर, पुरंदर व भोर तालुक्यातील (जि. पुणे) कृषी व अकृषक वर्गवारीतील 23 लाख 65 हजार 763 (92 टक्के) वीजग्राहकांनी महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. लॉकडाऊनमध्ये या ग्राहकांना वीजबिलांची माहिती ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहेत.
सातारा जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील 9 लाख 41 हजार 530 पैकी 8 लाख 82 हजार 582 (93.74 टक्के) वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. यामध्ये कऱ्हाड विभाग- 2 लाख 41 हजार 314, फलटण – 1 लाख 52 हजार 206, सातारा – 2 लाख 39 हजार 788, वडूज – 1 लाख 34 हजार 495 आणि वाई विभागातील 1 लाख 14 हजार 779 वीजग्राहकांचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यातील ऊर्वरित वीजग्राहकांना सुद्धा महावितरणच्या 9930399303 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9930399303 क्रमांकावर MREG(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24×7 सुरु असणाऱ्या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल ऍ़पद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.
याशिवाय वीजग्राहकांसाठी महावितरण मोबाईल ॲपमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकाच खात्यातून ग्राहकांना त्यांचा स्वतःच्या अनेक वीजबिल पाहणे व त्यांचा भरणा करण्याची सोय आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. हे मोबाईल अॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून ‘अन्ड्राईड’, ‘विंडोज’ व ‘आयओएस’ या आँपरेटींग सिस्टीममच्या मोबाइलमध्ये हे अॅप डाऊनलोड होईल अशी सुविधा आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटसह गुगल प्लेस्टोर, अपल अप स्टोरमधून डाऊनलोड करण्याची सोय आहे.