कराड : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत सोमवारी (दि. 11) येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात (टाऊन हाँल) बारामती परिमंडलाने सादर केलेल्या ब्रिज या नाटकाला नाट्यरसिकांनी भरभरून दाद दिली. महावितरणच्या कर्मचार्यांनी केलेल्या नाट्य अविष्काराने नाट्यरसिक मंत्रमुग्ध झाले.
महावितरणच्या बारामती परिमंडलद्वारे आयोजित या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन कार्यकारी संचालक (मानव संसाधऩ) श्री. चंद्रशेखर येरमे यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सचिन तालेवार, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके, प्रभारी मुख्य अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर, महापारेषणच्या प्रभारी मुख्य अभियंता सौ. शिल्पा कुंभार यांची उपस्थिती होती. सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबविण्यासोबतच महावितरणने कर्मचार्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व योग्य व्यासपीठ निर्माण करण्यासाठी नाट्यस्पर्धा व क्रीडा स्पर्धेचे आयोजन सुरु केले आहे. त्यामुळे कर्मचार्यांना नवीन ऊर्जा मिळण्यासोबतच महावितरणमध्ये समृद्ध सांस्कृतिक वातावरण निर्माण होत आहे, असे मत कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्री. चंद्रशेखर येरमे यांनी व्यक्त केले. यावेळी मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. श्रीकृष्ण वायदंडे यांनी केले तर श्री. संतोष भोसले व श्वेता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कराड विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अभिमन्यू राख यांनी आभार मानले.
पहिल्या सत्रात बारामती परिमंडलाने श्री. विजय मोंडकर लिखित ब्रिज ही नाट्यकृती सादर केली. रेल्वे स्टेशनच्या ब्रिजखाली असणार्या भिकार्यांचे आयुष्य जगताना वेगवेगळ्या वेदनेचे डंख सहन करीत स्वतःच्या संवदेना जिवंत ठेवत माणुसकी दाखविणार्या काही माणसांच्या वास्तववादी नाट्यकृतीने रसिक हेलावले.
या नाटकात प्रमुख भूमिका करणारे राम चव्हाण, दत्ता चव्हाण, विलास काळे, प्रमोद मोहिते, रुकय्या शिलेदार यांनी दर्जेदार अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. व रसिकांनी देखील त्यांच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. मंगळवारी (दि. 12) दुपारी या नाट्यस्पर्धेचा समारोप होणार असून त्याआधी सकाळी 10.30 वाजता कोल्हापूर परिमंडलाचे चरणदास चोर हे नाटक सादर होणार आहे.
ब्रिज नाट्यकृतीला नाट्यरसिकांची भरभरून दाद
RELATED ARTICLES