म्हसवड : माण तालुक्याती व्यवसाया व नोकरी निमित्ताने पुणे येथे स्थायिक झालेल्या माण वासिंयाचा नुकताच पुण्यात स्नेहमेळावा संपन्न झाला. कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माणदेश फौंडेशनचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून फौंडेशनकडून राष्ट्रीय खेळाडू, युपीएसी, एमपीसीसीतून शेकडो विद्यार्थ्यांना सर्वतोपरि मार्गदर्शन करून अनेक प्रशासकीय अधिकारी घडविले त्याचबरोबर आरोग्य शिबीर, कार्यशाळा, महिलांना मार्गदर्शन अशी अतुलनीय कार्य केले जात असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती ना.रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
पुणे अल्पबचत भवन येथे माणदेश फौंडेशनच्या वतीने माणदेशी लोकांचा स्नेह मेळावा व विविध क्षेत्रातील माणदेशी रत्नांचा पुरस्कार प्रदान गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना.महादवेराव जानकर, जि.प.अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माजी कोकण आयुक्त व माणदेश फौंडेशनचे मार्गदर्शक प्रभाकर देशमुख, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर, सारंग पाटील, पोपट मलिकनेर, बीजीएसचे शांतीलाल मुथा, भाऊसाहेब गलंडे,सदाभाऊ खाडे, जगन्नाथ विरकर, तानाजी सत्रे, माणदेश फौंडेशनच्या विश्वस्त अनुराधा देशमुख, कॉग्रेसचे माण तालुकाध्यक्ष एम.के.भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, मनोज पोळ, सिध्दार्थ गुंडगे, आदी मान्यवर माणदेशी लोक उपस्थित होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासह माणदेशी रत्नांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
ना.रामराजे ना.निंबाळकर म्हणाले, माणच्या मातीत एक वेगळाच गुण आहे.तो कधीच मातीला न विसरता आपुलकीच नात कायम ठेवत असतो.
माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले , यशवंतराव चव्हाण यांच्यामुळेच मी आज येथे उभा आहे.त्यांच्याच नावाने मला पुरस्कार मिळाला हे माझे भाग्य समजतो. म्हसवडचे सिध्दोबा आमचे दैवत असून देवभूमीतला सत्काराचा अभिमान वाटतोय.
ना.जानकर म्हणाले, माणदेश फौंडैशनचे कार्य प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले सुरू आहे.माणच प्रशासन चांगले आहे त्यामुळे चांगली कामे होत आहेत.
माणदेशासाठी पुण्यात एक मोठे वसतिगृह असावे त्यात विद्यार्थ्यांना निवासाची सोय व्हावी तसेच विविध कोर्स, प्रशिक्षणे, यूपीएससी, एमपीएससीचा अभ्यास करता यावा यासाठी जागा उपलब्ध करून प्रस्ताव द्यावा आम्ही यासाठी प्रयत्न करतो असे सभापती ना. रामराजे, ना.जानकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जि.प.अध्यक्ष विश्वासराव देवकाते,सदाशिव खाडे, शांतीलाल मुथा आदींनी मनोगते व्यक्त केली.नितीन वाघमोडे यांनी फौंडैशनची ध्येयधोरणांबाबत मार्गदर्शन केले. माणदेश गौरव सोहळा पार पाडण्यासाठी आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, अध्यक्ष अशोक माने, उपाध्यक्ष विजयराव पिसे, सुनील बाबर, प्रविण काळे, संदीप सुळे, अभिजीत माने, मिलींद पिंगळे सर्जेराव भोसले, आनंद जगताप, यशवंत काळेल आदींनी विशेष परिश्रम घेतले.प्रास्ताविक अशोक माने यांनी केले.सूत्रसंचालन आकाश पाटील यांनी करून आभार अभय जगताप यांनी मानले.