पाटण दि.१५ ( शंकर मोहिते ) – ९ ऑगस्ट पासून पाटण तहसील कार्यालयासमोर मराठा आंदोलनात दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी व मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली होती. या आंदोलना दरम्यान १५ ऑगस्टला सर्व शासकीय – निमशासकीय ठिकाणी जिजाऊंच्या लेकींच्यां हस्ते ध्वजारोहण करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केले होते. शासनाने याची गांभीर्याने दखल घेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या आश्र्वासनानंतर १३ ऑगस्ट ला ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. तरी देखील मराठा क्रांती मोर्चाच्या अहवानास प्रतिसाद देत पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी सामाजिक, बंधुभाव, ऐकता, जोपासून जिजाऊंच्या लेकींनीं ७२ व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण केले.
पाटण तहसील कार्यालयासमोरील मराठा क्रांती मोर्चाचे ९ ऑगस्ट ला बेमुदत सुरू करण्यात आलेले ठिय्या आंदोलन स्वातंत्र दिन १५ ऑगस्ट च्या आधी दोन दिवस १३ ऑगस्टलाच स्थगित करण्यात आले. मात्र २५ जुलै पासून सुरू झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुक्याच्या वतीने घेण्यात आला होता. या दरम्यान शासनाला व पोलीस यंत्रणेला जाग आणण्यासाठी १५ ऑगस्ट ला शासकीय – निमशासकीय कार्यालये, शाळा – महाविद्यालय या सर्व ठिकाणी होणारे ध्वजारोहण जिजाऊंच्या लेकींच्यां हस्ते होईल. मग ती जिजाऊंची लेक कोणत्याही समाजाची असली तरी चालेल असा इशारा देण्यात आला होता. याची गांभीर्याने दखल घेत शासनस्तरावर सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीचे सदस्य शरद काटकर, सुधाकर देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी अगंद जाधववर यांना बरोबर घेऊन पाटण येथे आंदोलन ठिकाणी भेट दिली. यावेळी आंदोलकांशी थेट चर्चा करून दाखल झालेल्या गुन्ह्यांची शहानिशा करून गुन्हे मागे घेणार असल्याचे आश्र्वासनानंतर सोमवार दि.१३, ऑगस्ट ला आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलन स्थगित झाले म्हणजे आंदोलनातील आंदोलकांच्या घोषणा हि स्थगित झाल्या असे आतापर्यंत समजले जात होते. मात्र पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या अहवानाला प्रतिसाद देत सामाजिक, बंधुभाव, ऐकता, जोपासत नारी शक्तीला सन्मान देत पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी जिजाऊंच्या लेकींच्यां हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरडेवाडी येथे कु. तेजस्वी आनंदा जाधव हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्री. नागोजीराव पाटणकर वाचनालय पाटण येथे सौ. सविता चंद्रहार निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. न्यु. इंग्लिश स्कूल धावडे येथे सौ. संगिता लक्ष्मण सांळुखे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पाटण व्हैली इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थींनी तृप्ती देसाई, सिनिया सय्यद, सारा वसगडेकर, श्रावणी खांडके, तर ठोमसे येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कु. सुप्रिया काटकर या जिजाऊंच्या लेकींनीं ध्वजारोहण केले. पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी सर्व समावेशक सर्व समाजातील जिजाऊंच्या लेकींनें ध्वजारोहण केल्याने या निमित्ताने पाटण तालुक्यातील सामाजिक, बंधुभाव, ऐकता आणि नारी शक्तीचा सन्मान होत असल्याचे सर्वां समोर आले.