
पाटण दि.१३:- ९ ऑगस्ट पासून पाटण तहसील कार्यालयासमोरील मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन ५ व्या दिवशी सुरूच राहिल्याने या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले गेले. २५ जुलै रोजी झालेल्या महाराष्ट्र बंद पासून अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली. अपवाद वगळता पाटण तालुक्यातील आंदोलने शांततेच्या मार्गाने झाली. या आंदोलनात काही ठिकाणी अपप्रवृत्ती घुसली. अपप्रवृत्तीची संपूर्ण शहानिशा करून पाटण तालुक्यातील इतरांवरील गुन्हे मागे घेतले जातील. असे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख विजय पवार यांनी पाटण येथे मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आश्र्वासन दिल्याने पाटण येथील मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन स्थगित झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख विजय पवार, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी अगंद जाधववर यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन ठिकाणी मागण्यांचे निवेदन दिले.
मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी, आरक्षणाच्या मागणीसाठी आणि आंदोलकांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत पाटण येथील मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन बेमुदत सुरू राहणार आणि बुधवारी होणाऱ्या स्वातंत्र्य दिन १५ औगस्टचे ध्वजारोहण शासकीय अधिकारी, पदाधिकारी यांना करू दिले जाणार नाही. असा इशारा आंदोलकांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार स्वत: पाटण येथे ठिय्या आंदोलन ठिकाणी हजर राहिले. यांच्या बरोबर मराठा क्रांती मोर्चाचे सातारा जिल्हा समन्वयक शरद काटकर, सुधाकर देशमुख हे हि उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद काटकर म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने बंद झाली असली तरी मराठा समाजाच्या मागण्या साठी पाटण येथील आंदोलन सुरू आहे. हा मराठा समाजाचा खरा अभिमान आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासाठी तीन महिन्यांचा अवधी मागितला आहे. या तीन महिन्यांत मराठ्यांच्या मागण्यांची पूर्तता केली नाही तर पुन्हा मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे. तीस वर्षे थांबलो आता तीन महिने थांबण्यास काही हरकत नाही. राहिला विषय आंदोलनात मराठा मुलांच्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी पोलीस यंत्रणेने या गुन्ह्याचीं शहानिशा करून गुन्हे मागे घेण्याचे आश्र्वासन दिली आहे. यामुळे हे ठिय्या आंदोलन स्थगित करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
आंदोलन स्थगित करत असताना पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात मराठा आरक्षणा बरोबर कोपर्डी प्रकरणातील फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींना त्वरीत फाशी देण्यात यावी. ऐट्रासिटी कायदा आणखी कडक करून खोटी ऐट्रासिटी दाखल करणा-या फिर्यादीला ऐट्रासिटी तील शिक्षेची तरतूद करावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील कारवाई त्वरीत करावी. तसेच पाटण तालुक्यातील आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे. आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुका समन्वयक यशवंतराव जगताप, सुरेश पाटील, धर्यशिल पाटणकर, राजाभाऊ काळे, राजेंद्र पाटणकर, बकाजीराव निकम, लक्ष्मण चव्हाण, अनिल भोसले, मंगेश पाटणकर, शंकर मोहिते, गणेश मोरे, नितीन पिसाळ, राजेंद्र मोरे, कुमार सांळुखे, महेश पाटील, ऐ.पी. पाटील, डि. जी. घाडगे. आदीसह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.