पाटण:- पाटण येथील श्री. लक्ष्मी देवी, श्री. निनाई देवी या ग्रामदेवतेचे पुजारी ह.भ.प. हणमंतराव गुरव यांचा ७५ वा अम्रुतमहोत्सवी वाढदिवस गुरव कुटुंबियांनी नुकताच उत्साहात साजरा केला. वाढदिवसादिनी पाटण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, माजी सरपंच चंद्रकांत मोरे, दिपकसिंह पाटणकर, पाटण तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शंकर मोहिते, विक्रांत कांबळे आदी हितचिंतकांनी हणमंतराव गुरव यांना शुभेच्छा दिल्या.
ह.भ.प. हणमंतराव गुरव हे ज्ञानेश्वरी माऊली पालखी सोहळ्याचे शिंगवादक मानकरी आहेत. गेल्या पस्तीस वर्षापासून त्यांनी अखंड आळंदी ते पंढरपूर पायी पालखी सोहळा केला. या माऊलीच्या पालखी सोहळ्यात माऊली बरोबर शिंग निनाद करुन माऊलींच्या अशिर्वादाने वारकऱ्यांना प्रोत्साहन दिले. शिंगवादनाने त्यांनी पाटण तालुक्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात केली. चालू वर्षी कोरोनाच्या संकटात इतिहासात पहिल्यांदाच पालखी सोहळा रद्द झाल्याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आली.
ह.भ.प. हणमंतराव गुरव यांनी पाटण ग्रामपंचायती मधे प्लंबर म्हणूनही काही काळ काम केले. श्री. लक्ष्मी – निनाई देवीच्या सेवेबरोबर त्यांनी सामाजिक सेवा ही अखंड केली. त्यांचा परिवार देखील मोठा आहे. ७५ वा अम्रुतमहोत्सवी वाढदिवस साजरा करताना बंधू रामचंद्र गुरव, भगिनी श्रीमती कुसूम, मंगल, सुनंदा चिरंजीव आनंदा, मिलिंद, मुकूंद, मकरंद, तसेच भाचे आणि पुतने सुर्यकांत, मारुती, तानाजी, शरद, सागर, चंद्रकांत व सुना – नातवंडे असा समस्त गुरव परिवाराने ह.भ.प. हणमंतराव गुरव यांचे आशिर्वाद घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.