सातारा : उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे त्या-त्या भागातील स्थानिक नेत्यांचे कर्तव्य आहे. सातारा शहरानजीक एमआयडीसीमध्ये मोकळे प्लॉट आहेत; पण या ठिकाणी होतकरू नवउद्योजकांना जागा मिळत नाही. स्थानिक नेत्यांनी थोडा दिलदारपणा दाखवून उद्योजकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली.
वाढे फाटा सातारा येथील देविका मंगल कार्यालयात मराठा बिझनेस फोरमच्या वतीने आयोजित मराठा उद्योजक पुरस्कार व पदग्रहण समारंभात ते बोलत होते. छ. शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरूचे लेखक नामदेवराव जाधव, फोरमचे कार्यकारी अध्यक्ष अरुण पवार, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, प्रभाकर देशमुख, हेमंत बर्गे, जिल्हाध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, उपाध्यक्ष मनोज देशमुख, हरिष पाटणे, राजेंद्र सावंत, जगदीश शिर्के, वैशाली निंबाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, मराठा तितुका मेळावा उद्योजक त्यातून घडावा या हेतूने मराठा बिजनेस फोरम कार्यरत असून महाराष्ट्र पुढे नेण्याचे काम फोरमच्या माध्यमातून होत आहे. मराठा समाज एकत्र येत नाही, उद्योगाकडे वळत नाही, असे म्हटले जाते; पण सगळ्यांना एकाच फूटपट्टीत मोजणे योग्य नाही. अनेक मराठा उद्योजकांनी साताऱ्यात नव्हे तर राज्यात, देशात तसेच बाहेरील देशातही आपला नावलौकिक केला आहे. यामुळे मराठा समाजही उद्योगात यशस्वी होऊ शकतो याची खात्री बाळगता येईल.
मराठा व्यावसायिकांनी व्यवसायातील बारकावे शिकावेत. एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांना सहकार्य करावे, शक्यतो भागीदारीमध्ये व्यवसाय करावेत. यामुळे नुकसान झाले तरी कमीत कमी होते. पूर्वी व्यवसाय म्हटले की कर्ज नको, अशी वडीलधाऱ्यांची मानसिकता होती; परंतु सध्या काळ बदलला आहे. व्यवसाय सुरू करतानाच स्वतःचे आलिशान व वातानुकूलित कार्यालय यावर उधळपट्टी न करता पैशाचे योग्य नियोजन करून व्यवसाय वाढवावा. असेही अजितदादा पवार म्हणाले.
सदर कार्यक्रमात सारथी संस्था तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ तर्फे मार्गदर्शन करण्यात आले व त्यासंबधीत योजनांची माहिती देण्यात आली . छ शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचे लेखक प्रा नामदेवराव जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . सदर कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील अनेक मराठा व्यवसाईक , नव उद्योजक , सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते . एमबीएफ तर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील उद्योजकांना मराठा उद्योजक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .

कृती बरोबरच बोलणेही महत्त्वाचे…
– शिवाजी द मॅनेजमेंट गुरू या पुस्तकाचे लेखक नामदेवराव जाधव यांच्या व्याख्यानातून युवकांना प्रेरणा मिळते. ते नेहमी बोलतात की बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची; पण नामदेवराव व्याख्यानांचेही शुल्क घेतात.
– त्यामुळे जे जेव्हा बोलताना कृती महत्त्वाची म्हणतील तेव्हा बाेलणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे युवकांनी सांगावे. अजित पवार यांच्या या कोपरखळीला उपस्थितांसह जाधव यांनीही खळखळून हसत दाद दिली.

