Friday, April 25, 2025
Homeठळक घडामोडीजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले

जागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले

सातारा : देशामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. या योजना तळागाळात पोहोचल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य गोरगरिबांना समजले आहे. मोदी यांनी दलितांच्या बाजूने अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे ते दलितविरोधी नाहीत. त्यांची तरूणांमधील क्रेझ अजूनही कायम आहे. सन 2019 मध्ये होणार्‍या निवडणुकीत कमी जागा मिळाल्या तरी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच राहतील. काँग्रेस व राहुल गांधी हे स्ट्राँग होत नाहीत तोपर्यंत नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
समर्थ सदन येथे ज्ञानविकास मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेच्या  समारोपप्रसंगी मोदी सरकारला पर्याय नाही या विषयावर ते बोलत होते. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, ज्ञानविकास मंडळाचे अध्यक्ष वि. ल. चाफेकर, अ‍ॅड. डी. बी. देशपांडे व मान्यवर उपस्थित होते.
ना. रामदास आठवले म्हणाले, सध्या काँग्रेसची अवस्था बिकट आहे. जिथे तिथे काँग्रेसचा पराभव होत आहे. त्यामुळे जोपर्यंत काँग्रेस व राहुल गांधी स्ट्राँग होत नाहीत तोपर्यंत नरेंद्र मोदीच स्ट्राँग राहणार आहेत. 2019 च्या निवडणूकीत तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी देशातील सर्व जाती धर्मार्ंचा पाठिंबा नरेंद्र मोदी यांना आहे. त्यामुळे पुढील 10 वर्षे मोदी हेच पंतप्रधान राहणार आहेत. सध्या भाजप व शिवसेनेचे फाटले आहे. भविष्यात जरी सेनेने भाजपशी युती केली नाही तरी रिपाइंफ भाजपसोबतच राहणार आहे. ते प्रधानमंत्री झाल्याशिवाय मी मंत्री होणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी  त्यांनी केली. 5 वर्षांपूर्वी कर्नाटकात भाजपला 34 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत 104 जागा मिळाल्या आहेत. यामुळेच राज्यपालांनी त्यांना सत्तेसाठी निमंत्रित केले होते. आपण बहुमताचा ठराव जिंकू, असा विश्‍वास येडीयुरप्पा यांना होता. मात्र, त्यांनी सभागृहात राजीनामा दिला. येडीयुरप्पांचा राजीनामा आणि  कुमारस्वामी यांची होणारी मुख्यमंत्रीपदी निवड हा लोकशाहीचा विजय आहे, असेही ना. आठवले म्हणाले.
भीमशक्ती व शिवशक्तीच्या माध्यमातून मी शिवसेना-भाजपमध्ये आलो. गत निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारतफ अशी घोषणा केली होती. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोदींच्या अनेक सभांना  मी उपस्थित होतो. त्यांनी काँग्रेसविरोधी भूमिका लोकांसमोर मांडली. त्यामुळे तरूणांमध्ये क्रेझ निर्माण केली. देशात काँग्रेसला केवळ 42 तर भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या.  त्यावेळी भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करता येत होते. मात्र, सर्व पक्षांना बरोबर घेऊन त्यांनी सरकार स्थापन केले. काळा पैसा आणण्यासाठी  नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. याचा जरी लोकांना त्रास झाला असला तरी सर्वसामान्यांमध्ये या निर्णयाची भावना चांगली होती, असेही ते म्हणाले.
नोटाबंदीनंतरही उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत भाजपला 325 जागा मिळाल्या. मोदी सरकार आल्यापासून पारदर्शी कारभार सुरू आहे. लोकांसाठी व लोकांच्या फायद्यासाठी सत्तेवर आलेले हे सरकार आहे. मोदी हे दलित विरोधी आहेत, असा आरोप विरोधक करत आहेत. मात्र, मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल स्कूलची उभारणी, लंडन येथील बाबासाहेबांच्या घराची  खरेदी आणि इंदू मिल येथे बाबासाहेबांचे भव्य स्मारक असे निर्णय घेतले आहेत.  संविधानामध्ये बदल करण्यात येेणार असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत आहेत. मात्र, संविधान बदलणार नसल्याची स्पष्ट भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे घटना बदलण्याचा प्रश्‍न येत नाही, असेही ते म्हणाले. प्रसाद चाफेकर यांनी प्रास्ताविक केले. हेमांगी जोशी यांनी सूत्रसंचलन केले.
मग कसे होतील पंतप्रधान राहुल गांधी…!
ना. रामदास आठवले यांनी भाषणाची सुरूवातच काव्याच्या अंदाजात केली.1971 पासून सुरू झाली व्याख्यानमाला, ती म्हणजे पेटलेल्या विचारांची ज्वाला, मी तर आहे सच्चा जयभीमवाला, मला आवडली तुमची व्याख्यानमाला या काव्य पंक्तींनी ना. आठवले यांनी व्याख्यानमालेत रंग भरले तर भाषणाचा शेवट 10 ते 15 वर्षे राहणार मोदींची आंधी, मग कसे पंतप्रधान राहुल गांधी या पंक्तींनी केला. यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular