कराड: पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील भाग्यश्री मानेला न्याय मिळावा, मारेकर्यांचा शोध घेऊन त्यांना गजाआड करावे तसेच माने कुटुंबीयांना अर्थिक मदत केली जावी या मागण्यांसाठी नाभिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी कराडमधील सौ वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात सुमारे सात तास ठिय्या आंदोलन केले.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात येऊन तब्बल 14 तासांनी भाग्यश्री मानेचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला.
बारावीतील विद्यार्थिनीचा गळा चिरून खून झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. भाग्यश्री संतोष माने (वय 17, रा. करपेवाडी) असे संबधित युवतीचे नाव आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड (जि. सातारा) येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. त्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मात्र भाग्यश्रीच्या मारेकर्यांचा त्वरित शोध लागावा यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून नाभिक संघटनेच्या राज्यातील पदाधिकार्यांसह पाटण तालुक्यातील सदस्यांनी भाग्यश्री च्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आंदोलन सुरू केले होते.
दरम्यान नाभिक संघटनेच्यावतीने भाग्यश्री माने हिच्या मारेकर्यांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे जाहीर करून उपजिल्हा रुग्णालय परिसरात ठिय्या मारल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख विजय कुंभार, कराड शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र जोपर्यंत जिल्हा पोलिस प्रमुखांशी सकारात्मक चर्चा होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात येणार नसल्याचेही संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, कराड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी आंदोलकांशी चर्चा करून भाग्यश्री माने यांच्यासह माने कुटुंबियांना न्याय देऊ अशी ग्वाही दिली. त्यामुळे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आंदोलन मागे घेत भाग्यश्रीचा मृतदेह ताब्यात घेण्यास संमती देण्यात आल्याने तणाव निवळला.
विविध मागण्यांसाठी नाभिक संघटनेचे ठिय्या आंदोलन
RELATED ARTICLES