सातारा – प्रतिनिधी – फलटण तालुक्यातील नांदल गावच्या हद्दीतील गट क्रमांक ५९२, ५९३, ५९५, ५९६, ५९७ व ६३४ या क्षेत्रांमध्ये महसूल विभाग , वनविभागाच्या संगनमताने अनधिकृत गौण खनिजाचे बेसुमार उत्खनन व क्रशर उद्योग सुरू आहे . यावर कारवाई करण्याची मागणी करुन फलटण महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याने सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषणाला बसले होते. याची तत्काळ दखल घेऊन उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी ईटीएस मोजणी करण्याचे आदेश जारी करून दणका दिला आहे.
नांदल गावच्या हद्दीतील गट क्रमांक ५९२, ५९३, ५९५, ५९६, ५९७ , ६३४ या क्षेत्रांमध्ये गौण खनिजाचे बेसुमार उत्खननामुळे संपूर्ण परिसरात धुरळ्याचे साम्राज्य पसरले असून शेती, पर्यावरण व वन्यजीव यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या अनाधिकृत उत्खनन आणि सुरु क्रशरवर कारवाई होईपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. तरीही दखल घेतली नसल्याने दि.२६ जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुशांत मोरे हे बसले होते. या मागणीत तत्थ लक्षात घेऊन उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी संबंधित गौण खनिज उत्खननाची इटीएस मोजणी करण्याचे आदेश दिले. यामुळे सुशांत मोरे यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनापासून महसूल, पोलीस, वनविभाग, सहकार, जिल्हा परिषद, नगरविकास आदी विभागांतील विविध विषयांवर चुकीच्या घडलेल्या घटना, भ्रष्टाचार याविरोधात सुशांत मोरे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. नांदल पाठोपाठ इतर काही विषयांची संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी दखल घेत लेखी आश्वासन तर आचारसंहितेचे कारण पुढे करून चौकशी आणि कारवाईसाठी मुदत मागत उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. त्यानंतर नगरपालिका उपायुक्त बापट यांच्या हस्ते सरबत देऊन उपोषण स्थगित केले. प्रशासनाने विविध मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक मनोज शेंडे, शंकर माळवदे उपस्थित होते.
.

