सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलातील मोटार विभागातील पो.हवालदार संजय देशमाने यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे -पाटील यांचे रेखाटलेले कॅनव्हॉसवरील तैलचित्र 2 -2.5 आकारातील नुकतेच सातारा येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात यूथ पार्लमेंट चॅम्पियन स्पर्धेतील बक्षिस समारंभात नांगरे – पाटील यांना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या वतीने देण्यात आले.
दरम्यान, पो.हवालदार संजय देशमाने यांनी नांगरे -पाटील यांचे रेखाटलेले 50 वे कॅनव्हासवरील तैलचित्र असून आत्तापर्यंत त्यांनी दुर्मिळ अशी कॅनव्हासवरील 50 पेक्षा जास्त तैलचित्र रेखाटली आहेत. त्यामध्ये तत्कालीन माजी पोलीस महासंचालक सुर्यकांत जोग, विशेष पोलीस महानिरीक्षक मेकला, अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे, पो. अधीक्षक डॉ. जय जाधव यांची तैलचित्रे रेखाटली आहेत. याशिवाय शिवराज्याभिषेक, जंजीरा किल्ल्याची पाहणी करताना छ. संभाजी महाराज अशी अनेक ऐतिहासिक तैलचित्रे श्री. देशमाने यांनी साकारली असून त्यांच्या तैलचित्राचे पोलीस अधिकार्यांनी कौतुक करून त्यांच्या या अनोख्या छंदाला प्रोत्साहनही देत आले आहेत.
सातारा येथील कार्यक्रमात चित्रपट अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना छ.संभाजी महाराज यांचे तैलचित्र बनवून देण्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सुचविले. कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे – पाटील पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपाधिक्षक राजलक्ष्मी शिवणकर, एलसीबी चे पो.नि. पद्माकर घनवट, डॉ.अमोल कोल्हे आदींची उपस्थिती होती.