Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीnatraj mandiratil devtancha varshik rathostav sampan

natraj mandiratil devtancha varshik rathostav sampan

श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील देवतांचा वार्षिक रथोत्सव संपन्न
रविवारी कल्याणोत्सव आणि महाप्रसादाने उत्सवाची सांगता
साताराः कांची कामकोटी पीठाचे महास्वामी प.पू. शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती तसेच प.पू. जयेंद्र सरस्वती व त्यांचे परमशिष्प प.पू. शंकरविजयेंद्र सरस्वती यांच्या शुभाशिवार्दाने सातारा येथे साकारण्यात आलेल्या प्रसिध्द अशा श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील देवदेवतांचा वार्षिक भव्य दिव्य रथोत्सव सातारा शहरात अमाप उत्साहात व भक्तिभावात आज शनिवारी संपन्न झाला.
वेदमूर्ती दत्ताशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी देवता पूजन करुन शंख ध्वनीच्या मंगलमय वातावरणात या देवांच्या मूर्ती वेदमंत्रांच्या जयघेाषात रथाकडे आणण्यात आल्या.कर्नाटक-कुमठा येथून आणलेल्या अजंठा शैलीतील काष्ठ रथात मंदिरातील सर्व देवदेवतांच्या मूर्तींना फुलांच्या सजावटीत विराजमान केल्यावर रथाचे पूजन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना.शेखर चरेगावकर व त्यांच्या पत्नी सौ. गिरीजा चरेगावकर यांच्या हस्ते तसेच सातारा येथील मिनाक्षी हॉस्पीटलचे प्रमुख डॉ. प्रतापराव गोळे, डॉ. सौ. रंजीता गोळे आणि हरेश फ्लोअर मिलचे संचालक हरेश दोशी व सौ. वर्षा दोशी , अ‍ॅड. विलास आंबेकर,सौ. अमिता आंबेकर,बाबूजी नाटेकर या सर्व मान्यवरांचे शुभहस्ते तसेच रमेश शानभाग, सौ.उषा शानभाग आदी मान्यरांचे उपस्थितीत करण्यात आले.यावेळी मंदिराचे विश्‍वस्त नारायण राव,रणजीत सावंत, मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन,ज्योतिषाचार्य के. शास्त्री, वासुदेवराव नायर,तसेच ब्रह्मवृंद आनंद शेठ कासट, पत्रकार अतुल देशपांडे,रमेश हलगेकर, राहूल घायताडे, श्री. शहाणे,सौ शहाणे, अय्यपा सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यंकर्ते व अन्य मान्यवर उपस्थित होते.
रथयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी हातात कलश घेतलेल्या पन्नास सुवासिनींनी रथयात्रेचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या रथाच्या पूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.या रथसोहळ्यात विष्णू शास्त्री भट, ओंकार प्रभू मिराशी, अजय जोशी, उदय कुलकर्णी आदी ब्रह्मवृंद सहभागी झाले होते.
रथ मिरवणूकीच्या अग्रभागी सनई जाधव चौघडा पार्टीचे मंगल सनई वादन सुरु होते.त्यामागे फुलानी सजवलेल्या छोट्या रथात शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी यांची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. मंदीराभोवती या रथाची प्रदक्षिणा होवून रथ शहराकडे मार्गस्थ झाला.रथयात्रेत शहनाई पार्टी,कृष्णानगर येथील पवन हनुमान भजनी मंडळ,प्रतापसिंहनगर येथील तुळजा भवानी भजनी मंडळ गायन व वादनाने सहभागी झाली होती.रथयात्रेचे सातारा शहरात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले व अनेक मान्यवरांनी या रथाचे दर्शन घेतले.रथयात्रेच्या मार्गावर भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावात व फटाक्यांच्या आतषबाजीत रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. भजनी मंडळे,वाद्य वृदांच्या गजरात सातारा शहरातील वातावरण यामुळे भक्तीमय झाले होते.
संपूर्ण रथमार्गावर महिलांनी देव देवतांचे पंचारतीनी औक्षण केले व पूजन केले.गोडोली येथील साई मंदीर चौक, पोवई नाका येथे रथाचे दर्शनासाठी भावीकांनी मोठी गर्दी केली होती. रथपूजन झाल्यावर नटराज मंदीर, जि. प. अध्यक्ष बंगला, साईबाबा मंदिर गोडोली, पोवईनाका, शिवतीर्थवरुन हा रथ सोहळा पोवई नाका , कुबेर विनायक मंदिर मार्गे सर्कीट हाउस वरुन नटराज मंदिर येथे सायंकाळी परत आला. सातारा येथील श्री शंकराचार्य मठ व श्री कृष्ण यजुर्वेद पाठशाळेतील ब्रह्मवृदांनी रथयात्रेच्या मार्गावर मंत्रोच्चार व वेदपठण केले. तसेच पोवई नाका येथे के.एस.डी.शानभाग विदयालयाच्या मुला व मुलींच्या झंाजपथकाने सुरेख खेळ सादर केले, तसेव रथयात्रा मार्गावर विविध प्रमुख युवा मंडळे, तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनीही रथाची पूजा केली व दर्शन घेतले.
रविवार दि. 23 डिसेंबरला सकाळी 5 ते 12 या वेळेत श्री गणपती होम, चर्तुवेद पारायण होउन पुणे येथील श्री राधाकृष्ण शास्त्री मेमोरियल ट्रस्टचे वतीने श्री नटराज व शिवकामसुंदरी देवीस महाभिषेक होउन या देवाचा लग्न सोहळा अर्थात कल्याणोत्सव संपन्न होणार आहे. त्यानंतर पारायण समाप्ती होउन महाप्रसाद वितरीत केला जाणार आहे. वरील सर्व रथोत्सवाचे कार्यक्रमास सातारकर भावीकांनी तन,मन,धन अर्पून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नटराज मंदिराचे व्यवस्थापकिय विश्‍वस्त रमेश शानभाग यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular