दुर्मिळ कलाकृती, पेंटिंग्ज, शिल्पकला पाहुन पर्यटक, इतिहास संशोधक अभ्यासक अचंबित
औंध : औंध येथील साता समुद्रापार किर्ती पोहचलेल्याश्री भवानी वस्तूसंग्रहालय व ग्रंथालयास शनिवारी जागतिक संग्रहालय दिनाचे औचित्य साधून हजारो पर्यटक, इतिहास अभ्यासक ,संशोधकांनी भेट देऊन संग्रहालयातील दुर्मिळ व अचंबित करणार्या कलाकृतींची पाहणी करून संग्रहालयातील कलाकृती, शिल्पे,पेंटिंग्ज, परदेशी ,शिवकालीन वस्तू पाहुन समाधान व्यक्त केले. दरम्यान सायंकाळी उशीरापर्यंत संग्रहालय पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून पर्यटकांनी गर्दी केली होती.
जागतिक संग्रहालय दिनाचे औचित्य साधून शनिवारी औंध येथील श्री वस्तू चित्रसंग्रहालय सर्वांना पाहण्यासाठी मोफत खुले ठेवले होते. यावेळी सुरूवातीला संग्रहालयाचे उपअभिरक्षक उदय सुर्वे यांनी पर्यटकांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी सातारा, सांगली,कोल्हापूर, मुंबई, पुणे, कर्नाटक तसेच विविध भागातून आलेल्या पर्यटक, संशोधक, इतिहास प्रेमी अभ्यासकांना संग्रहालय उभारणी, दुर्मिळ कलाकृती, पेंटिंग्ज, शिल्पकलाकूती व अन्य बाबींची सविस्तर माहिती दिली.
81 वर्षापूर्वी औंध संस्थानचे अधिपती कै.श्रीमंत भवानराव ऊर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी दुरदृष्टी ठेऊन उभारलेले संग्रहालय पाहून पर्यटक ही अचंबित झाले. यावेळी विविध दालनातील कलाकृतींची मांडणी, कोर्ट यार्डातील विविध शिल्पे पाहून अनेक पर्यटकांनी त्याबाबतची माहिती घेतली.
औंध येथील श्री भवानी वस्तूचित्रसंग्रहालयामध्ये सुमारे सात हजार दुर्मिळ कलाकृतींचा खजिना आहे. एकूण अठरा दालने, दोन कोर्ट यार्ड, गँलरीमध्ये यासर्व कलाकृती, पेंटिंग्ज, दुर्मिळ , हस्तीदंती वस्तू, चंदनामध्ये कोरलेल्या कलाकृती, विविध प्रकारचे स्टोन्स यांची मांडणी केली आहे. यामध्ये, मोनालिसा, ओलितीची पेंटीग्जने तर पर्यटकांच्या मनावर गारुड घातले तसेच शिवकालीन हत्यारे, छ.शिवाजी महाराज यांच्या हस्ताक्षरातील पत्राचा यामध्ये समावेश आहे.
जागतिक संग्रहालयदिनाचे औचित्यसाधून औंध संग्रहालयाचे सहाय्यक उपअभिरक्षक उदय सुर्वे यांनी सातारा येथील सोपान पुरी यांचे व्यक्तिचित्र काही मिनीटात रेखाटले .त्यांच्या हातांची जादुई करामत पाहुन यावेळी उपस्थित मान्यवर, पर्यटक मंत्रमुग्ध झाले. त्यांनी सुर्वे यांच्या कलासाधनेचे कौतुक केले.
जागतिक संग्रहालय दिनाचे औचित्य साधून हजारो पर्यटकांची औंध संग्रहालयास भेट;
RELATED ARTICLES