कृतीशील आराखडा संमत; जरुर तर जनआंदोलनाचा इशारा
कराड : येथील ऐतिहासिक जुना कृष्णा पूल वाचविण्यासाठी जुना कृष्णा पूल बचाव कृती समितीची आज (शुक्रवार) शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत स्थापना करण्यात आली. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, रिक्षा संघटना, वाहतूक संघटना, कराड परिसरतील ग्रामीण भागातील प्रतिनिधी, अभियंते व विविध समाजघटकातील प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. नगरपरिषद तसेच परिसरातील ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींचा व वकील, डॉक्टर, व्यापारी, सहकारी संस्था व संघटनांचे प्रतिनिधी, आजी-माजी नगरसेवक व समाजातील क्रियाशील नागरिकांचा या कृती समितीत समावेश करण्यात येणार आहे. जुना कृष्णा पूल बचाव कृती समितीच्या माध्यमातून हा पूल वाचविण्यासाठी कृतीशील आराखडा या बैठकीत सर्वसंमत करतानाच जरुर तर जनआंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
दि. 6 रोजी झालेली प्राथमिक बैठक, दि. 8 रोजी झालेली परिसर पाहणी यानंतर आज झालेल्या बैठकीत प्रास्ताविक करताना प्रा. अशोक चव्हाण म्हणाले, शहर व उपनगरांमध्ये प्रमुख दुवा असणारा व ब्रिटिशांनी उभारलेला पूल पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नवीन बांधकाम सुरू असलेल्या कृष्णा पुलाच्या बांधकामासाठी जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्याचा घाट घातला जात आहे. नवीन पुलाचा भराव सिध्दीविनायक हॉस्पिटलपर्यंत असण्याची शक्यता असून येथे बेकायदेशीरपणे रस्ता वळवला जाऊ शकतो. त्यामुळे पांढरीच्या मारुतीपासून मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता बंद होऊ शकतो. सुरू असलेल्या कृष्णा पुलापासून शहरात येताना मटण शॉपपासून सुरू होणारा भराव डॉ. एरम हॉस्पिटल पर्यंत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या पुलाकडे जाण्यासाठी रस्ता राहणार नाही. त्यामुळे परिसरातील व्यावसायिक देखील विस्थापित होण्याचा संभव आहे.
जुन्या पुलावरील वाहतूक नवीन तयार असलेल्या पुलावर वळविल्यास अभूतपूर्व वाहतूक कोंडी होणार आहे. शहराकडून विद्यानगरकडे दररोज जाणार्या जवळपास 50 हजार विद्यार्थ्यांची त्याचप्रमाणे हजारो नागरिकांची अडचण होणार असून शहराकडे दुपारी व सायंकाळी येणार्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना वाहतूक कोंडीस तोंड द्यावे लागणार आहे. यावेळी निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्था राखताना पोलीस दलाची दमछाक होणार आहे. जुन्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून पूल सुस्थितीत असून त्याचे मजबुतीकरण करण्याची शिफारस अभियंत्यांनी केली असल्याने हा पूल पाडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते म्हणाले.
डॉ. एरम निवासस्थानाच्या बाजूने जुन्या कृष्णा पुलापर्यंत शासनाच्या मालकीच्या जागेतूनच सर्व्हिस रोड (सेवा रस्ता) होऊ शकतो. तसेच कृष्णा कॅनॉलकडे जाताना मिलिट्री बॉईज होस्टेलच्या बाजूने शासनाच्या मालकीच्या जागेतूनच सर्व्हिस रोड तयार करुन सात मिटर रुंदीचा सर्व्हिस रोड तयार होऊ शकतो व तिनही पुलांचा चांगला वापर होऊ शकतो. विद्यार्थी वाहतूक, ऊस वाहतुकीच्या बैलगाड्या, तीनचाकी व चारचाकी लहान गाड्यांसाठी जुन्या पुलाचा वापर होऊ शकतो, असे प्रा. चव्हाण यांनी सांगितले.
आंदोलनाविषयी दिशादर्शक बोलताना सुधीर एकांडे म्हणाले, शासनाशी सुसंवाद साधण्यासाठी एका कृती समितीचे व समन्वय समितीचे गठण करण्याची आवश्यकता आहे. आंदोलनाची नेमकी दिशा ठरविण्यासाठी आंदोलनाचे तांत्रिक नियोजन करणेही गरजेचे आहे. प्रारंभी कृती समितीच्यावतीने निवेदन तयार करुन ते प्रशासनास सादर करावे व प्रशासनामधील जबाबदार अधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करुन यावर मार्ग काढावा लागेल.
नगरसेवक सौरभ पाटील म्हणाले, शहराच्या व परिसराच्या हितासाठी जुन्या पुलावरील वाहतूक सुरू राहणे आवश्यक आहे. यासाठी कृती समितीने कराड नगरपरिषदेकडे निवेदन द्यावे. या निवेदनास अनुसरुन जुन्या पुलाचे मजबुतीकरण तसेच हा पूल पाडला जाऊ नये यासाठी आवश्यक ते ठराव नगरपरिषदेकडून प्रशासनाकडे पाठविणे सोईचे होईल. या चळवळीला लोक चळवळीचे स्वरुप दिले पाहिजे. प्रशासनावर विसंबून चालणार नाही.
प्रशांत यादव म्हणाले, प्रशासनाने निवेदनाची त्वरित दखल घ्यावी म्हणून कृती समितीच्या मागण्यांवरील चर्चेसाठी आवश्यक असणार्या बैठकीस विशिष्ट मुदत देण्यात यावी. अन्यथा याच निवेदनात रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात यावा.
चर्चेत सहभागी होताना ग्रामपंचायतीचे ठराव घेण्यात यावेत, वाहतूक व विद्यार्थी वाहतूक संघटनांसह विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकार्यांचा कृती समितीत समावेश करावा, शहर व विद्यानगर परिसरातील शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांची निवेदने घ्यावीत, असेही ठरविण्यात आले.
सदर कृती समितीने मांडलेल्या प्रमुख मागण्यांचा ठराव देखील यावेळी संमत करण्यात आला. त्यानुसार सध्या या पुलावरून सुरू असणारी वाहतूक थांबविण्यात येऊ नये, नवीन पुलाचे बांधकाम करताना खबरदारीचा उपाय म्हणून हे काम रात्रीच्या वेळेत करण्यात यावे, काम पूर्ण झाल्यानंतर देखील विद्यानगर व शहराच्या बाजूला जोडणारा सात मिटर रुंदीचा सेवा रस्ता तयार करण्याबरोबरच जुना पूल दुचाकी, तीनचाकी वाहने, ऊस वाहतूक व पादचारी यांच्यासाठी पूर्ववत ठेवण्यात यावा.
महाराष्ट्र शासन व संबंधित विभागाच्या अधिकार्यांबरोबच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात कराड नगरपरिषद, पंचायत समिती, परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी जुना कृष्णा पूल पाडण्यात येऊ नये यासाठी ठराव कृती समितीकडे सुपूर्द करावेत असे आवाहनही बैठकीत करण्यात आले आहे.
या बैठकीस अरुण पाटील, रस्ता सुरक्षा विषयक अभ्यासक मधुकर शेंबडे (सातारा), राष्ट्रवादीचे प्रतापराव साळुंखे, शेतकरी संघटनेचे सचिन नलवडे, अनिल घराळ, साजिद मुल्ला, सुनिल कोळी, सुजित नलवडे, प्रदीप मराठे, शिवसेनेचे स्वप्नील कुलकर्णी, मावळा प्रतिष्ठानचे डॉ. योगेश कुंभार, झाकीर पठाण, क्रेडाईचे धनंजय कदम, मकरंद जाखलेकर, राजेश पोळ, श्रीहरी अष्टेकर, जयंत बेडेकर, हजारमाची परिसरातील आबासाो लोकरे, अनिकेत बचवत, दीपक लिमकर, शरद कदम, सतिश पवार, पोपट साळुंखे, धनाजी माने, सैदापूरचे मुरलीधर जाधव, जिजाबा साळुंखे, दयानंद पवार, रमेश पाटील, हातगाडी संघटना अध्यक्ष जावेद नायकवडी, माजी नगरसेवक संजय शिंदे, राहुल खोचीकर तसेच पत्रकार सतिश मोरे, दिलीप भोपते, देवदास मुळे, प्रमोद सुकरे, आनंदराव पाटील, सचिन देशमुख, श्रीकांत कुंभारदरे, अजिंक्य गोवेकर, समीर आराणके यांचेसह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराडचा जुना कृष्णा पूल बचाव कृती समिती स्थापन
RELATED ARTICLES

