कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील जरेवाडी गावानजिक धोम कालव्याच्या पोटपाटामध्ये (मायनर) अंदाजे 25 ते 30 वर्षीय अज्ञात महिलेचा पूर्णत: सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मयत अशी नोंद करुन तपासास सुरुवात केली असता, त्यामध्ये ओढणीने गळा आवळून खून केला असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात दाखल केला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, की जरेवाडी येथे पोटपाटामध्ये महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पडला असल्याची माहिती पोलीस पाटील विशाल जाधव यांनी सकाळी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, उपनिरीक्षक अविनाश राठोड व कर्मचार्यांनी जरेवाडी येथे भेट देऊन पाहणी केली असता, महिलेचा पूर्णत: सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
मृतदेहाची पाहणी केली असता, सदरहू मृतदेह हा अंदाजे 15 ते 25 दिवसांपूर्वीचा असू शकतो. ओढणीने गळा आवळून खून केला असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह सडला असल्याने ओळख पटवता अवघड झाले आहे. सदर महिलेची उंची 4 फूट 8 इंच एवढी आहे. तिच्या अंगावर पिवळसर रंगाचा फुल बाह्यांचा टॉप असून, त्यावर काळ्या रंगाची पाने व फुलांची डिझाईन आहे. काळ्या रंगाची लेगीज असून, अंर्तवस्त्रे हिरव्या व गुलाबी रंगाची आहेत. गळ्यात धातूची चेन, कानात काळ्या रंगाचा टॉप असून, त्यावर सिल्वर रंगाचे चमकीचे खडे आहेत. उजव्या हातात काळ्या रंगाचा पट्टा असलेले घड्याळ असून त्यावर अॅपल असे लिहिलेले आहे. डाव्या हातातील मनगटावर लाल रंगाचा दोरा बांधलेला आहे. हाताच्या बोटात तांब्याची पिळाची अंगठी आहे. हाताच्या आणि पायाच्या बोटावर फिक्कट गुलाबी रंगाचे नेलपेंट लावले आहे. पायात चप्पल असून, त्यावर सुध्दा अॅपल असेच लिहिलेले आहे. पायात पैंजण आहे.घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अज्ञात महिलेचा गळा आवळून खून केला असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा तपास करत आहेत.
कोरेगाव पोलिसांचे आवाहन
जरेवाडी, ता. कोरेगाव येथे आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाबाबत अथवा महिलेबाबत कोणास माहिती असल्यास, त्यांनी कोरेगाव पोलीस ठाणे दूरध्वनी क्र. (02163) 220233, पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा मोबाईल क्र. 9822444250, पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड मोबाईल क्र. 9823222250 यांच्याशी संपर्क साधावा. त्याचबरोबर मोबाईल क्रमांक 9604109907 व 8805009129 वर संपर्क साधून माहिती देऊ शकता. महिलेबाबत माहिती मिळाल्यास खुनाचा गुन्हा उघड होऊन महिलेला न्याय मिळू शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे.
जरेवाडीतील पोटपाटामध्ये महिलेचा मृतदेह आढळला; खुनाचा गुन्हा दाखल
RELATED ARTICLES