Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीदहीगाव विकास सोसायटीत 1 कोटी 38 लाखांचा गैरव्यवहार

दहीगाव विकास सोसायटीत 1 कोटी 38 लाखांचा गैरव्यवहार

लेखा परीक्षकांकडून सहकार खात्यास अहवाल सादर
कोरेगाव : दहीगाव, ता. कोरेगाव येथील विकास सोसायटीमध्ये सन 2011 ते 14 या कालावधीत 74 लाख 23 हजार 957 रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, त्याचे दि. 31 जानेवारी 2019 अखेरचे 13 टक्के दराने व्याज रक्कम 64 लाख 63 हजार 980 रुपये असे एकूण 1 कोटी 38 लाख 87 हजार 937 रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. याबाबतचा विशेष फेरलेखापरीक्षण अहवाल प्रमाणित लेखापरीक्षक आनंद कणसे यांनी सहकार खात्याला नुकताच सादर केला आहे.
सोसायटीमध्ये रोख रकमेचा प्रत्यक्ष गैरव्यवहार व प्रत्यक्ष अफरातफर तत्कालीन सचिव, तत्कालीन संचालक मंडळ व जिल्हा बँकेचे तत्कालीन विकास अधिकारी यांनी संगनमताने व संयुक्तरित्या केलेला आहे, असे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे कणसे यांनी अहवालामध्ये नमूद केले आहे. विकास अधिकार्‍यांनी बँकेच्या कर्ज धोरणाप्रमाणे सोसायटी कर्ज वाटप, कर्ज वसुली करणे, विकास सेवा सोसायटीच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे, विकास सेवा सोसायटीची आर्थिक तपासणी करणे आदीची कार्यपध्दती पार पाडलेली नसल्याने सोसायटीचे व सभासदांचे नुकसान केले आहे.
कणसे यांनी आपल्या अहवालामध्ये तत्कालीन संचालक मंडळामध्ये चेअरमन रामराव चव्हाण, व्हाईस चेअरमन धनसिंग चव्हाण, संचालक धैर्यसिंग चव्हाण, सुरेश चव्हाण, प्रकाश चव्हाण, काकासाहेब चव्हाण, प्रवीण चव्हाण, विजय चव्हाण, बाळकृष्ण चव्हाण, विठ्ठल चव्हाण, विलास चव्हाण, राजाराम चव्हाण, रंगराव गायकवाड, अंजना रणावरे, ज्योती खराडे, सचिव विजय कोकणे, तत्कालीन बँक विकास अधिकारी आनंदराव माने व बँकेचे शाखा व्यवस्थापक गोऊस खान पठाण यांच्यावर गैरव्यवहाराचा ठपका ठेवलेला आहे.
कर्ज खतावणीस बोगस नोंद म्हणून 15 लाख 35 हजार 483 रुपये, कर्ज वाटप दुसर्‍या सभासदाचे नाव दाखवून 2 लाख 24 हजार रुपये, मेंबर अनामत दुबार नावे 10 लाख 37 हजार 977 रुपये, मेंबर अनामत जमा नसताना नावे 46 हजार 891 रुपये, बँक ऊस कर्ज खाते, बँक व्याज खाते व बँक चालू ठेव खाते बोगस व दुबारा नावे दाखवून 7 लाख 31 हजार 808 रुपये, हातावरील रोख शिल्लक 13 लाख 40 हजार 523 रुपये, दि. 31 मार्च 2011 अखेर मेंबर कर्ज यादी फरक 19 लाख 43 हजार 275 रुपये, मेंबर डिव्हीडंड 1 लाख 50 हजार रुपये अशी एकूण 74 लाख 23 हजार 957 रुपयांची अफरातफर झाली असल्याचे कणसे यांनी नमूद केले आहे. या रकमेला दि. 31 जानेवारी 2019 अखेर 13 टक्के दराने व्याज लावण्यात आले असून, त्याची रक्कम 64 लाख 63 हजार 980 रुपये होत आहे.
कणसे यांनी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर, कोरेगावचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) संजयकुमार सुद्रिक यांना आपला विशेष फेर लेखापरीक्षण अहवाल सादर केला असून, एकूण 1 कोटी 38 लाख 87 हजार 937 रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या अफरातफर व गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular