अपशिंगेतील अकरा जणांना अटक : परस्पर विरोधी फिर्यादी दाखल
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील साप गणाच्या पंचायत समिती सदस्या शुभांगी काकडे यांचे पती नारायण रघुनाथ काकडे वय 39 रा.अपशिंगे, ता. कोरेगाव यांना विकासकामे करण्यास विरोध करत गावातीलच सात जणांनी जबर मारहाण केली. दरम्यान, या घटनेत परस्पर विरोधी तक्रारी दाखल होऊन अकरा जणांना रहिमतपूर पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
इन्नुस मुलांनी वय 45, मुसा सय्यद वय 29, नौशाद मुलांनी वय 36, महादेव पवार वय 47, अक्षय पवार वय 25, मयुर पवार वय 26, अस्लम सय्यद वय 49, नारायण रघुनाथ काकडे, प्रवीण कृष्णा भोसले, प्रमोद भीमराव भोसले, महेश मधुकर जाधव सर्व रा. अपशिंगे, ता. कोरेगाव अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती व नारायण काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवार,दि. 1 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास नारायण काकडे हे भरत काकडे यांच्या उसाला पाणी देण्यासाठी गावातून बेघर वस्तीकडे जाणार्या डांबरी रस्त्यावरून निघाले होते. बेघर वस्तीजवळ रस्त्यावर त्यांना त्यांचे मित्र राजेंद्र साठे व विशाल भोसले भेटले म्हणून ते त्यांच्याबरोबर बोलत उभे राहिले. त्याच वेळी त्या ठिकाणी इन्नुस मुलांनी, मुसा सय्यद, नौशाद मुलांनी, महादेव पवार, अक्षय पवार, मयुर पवार व अस्लम सय्यद हे आले. ते पंचायत समिती सदस्याचे पती आले आहेत. त्यांना आपण मंजूर होऊन आलेले घरकुल व रस्ता बांधून द्यायचा नाही, असे म्हणत मुसा मुलांनी याने नारायण यांच्या कपाळावर लोखंडी गजाने जोरदार प्रहार केला. तर त्याच्या इतर साथीदारांनी नारायण काकडे यांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या काकडे यांना त्यांच्या मित्रांनी घरी नेले. तेथून नारायण काकडे यांच्या भावाच्या मुलाने त्यांना उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली.
दरम्यान, महादेव मोतीराम पवार वय 61, रा.बेघर वस्ती अपशिंगे, ता. कोरेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवार, दि. 1 रोजी घरी बसलो असताना रात्री अकाराच्या सुमारास नारायण रघुनाथ काकडे, प्रवीण कृष्णा भोसले, प्रमोद भीमराव भोसले, महेश मधुकर जाधव सर्व रा. अपशिंगे, ता. कोरेगाव यांनी घरी येऊन संगनमताने दगडाने मारहाण केली. नारायण काकडे याने दारू पिऊन शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. मारहाण प्रकरणी चार जणांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ करत आहेत.
पंचायत समिती सदस्यांच्या पतीला बेदम मारहाण
RELATED ARTICLES