Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीदहिवडी-सातारा एस. टी. बसला कोरेगावात अपघात;35 प्रवासी जखमी

दहिवडी-सातारा एस. टी. बसला कोरेगावात अपघात;35 प्रवासी जखमी

कोरेगाव : प्रस्तावीत सातारा-म्हसवड-लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरापासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर वसना नदीच्या पुलाजवळ सोमवारी सकाळी दहिवडी-सातारा एस. टी. बस ही बाभळीच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात 35 प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सातारा आणि कोरेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, दहिवडी-सातारा बस (क्र. एम. एच. 11-बी. एल.-9429) ही 9.40 च्या दरम्यान कोरेगावहून सातार्‍याकडे निघाली होती. चालक रतन सोनबा नामदे, रा. म्हसवड, ता. माण हा वेगाने व बेदरकारपणे बस चालवत होता. कोरेगाव रेल्वे स्टेशनच्या पुढे आल्यानंतर तीव्र उतार्‍यावर चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला. प्रवाशांचे नशीब बलत्वर म्हणून चालकाने ही बस रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या बाभळीच्या झाडावर धडकवली. या अपघातात 35 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. अनेकांच्या डोक्याला आणि तोंडाला इजा झाली आहे.
अपघाताची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, उपनिरीक्षक संतोष मिसळे, अविनाश राठोड, वाहतूक शाखेचे हवालदार महादेव खुडे, रियाज शेख, किशोर भोसले, राहूल पवार यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यापाठोपाठ एस. टी. चे सातारा व कोरेगाव येथील अधिकारी, कर्मचारी देखील तेथे धावले. त्यांनी जखमींना तातडीने अन्य बसेसमधून सातारा आणि कोरेगाव येथील रुग्णालयात हलविले. कोरेगावचे आगार व्यवस्थापक पृथ्वीराज भुताळे व सहकार्‍यांनी जखमींना तातडीची आर्थिक मदत देऊ केली.
या अपघातात जखमी झालेले गोंदवले खुर्द, ता. माण येथील प्रवासी अमीरखान मुलाणी यांनी फिर्याद दिली आहे. बस चालक रतन सोनबा नामदे, रा. म्हसवड याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष मिसळे तपास करत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular