डॉ. देशमुख व सहकारी करणार आघाडीचा प्रचार
वडूज : राष्ट्रवादी काँग्रेसने आजपर्यंत केलेल्या अन्यायाला निवडणूकीच्या माध्यमातून धडा शिकविण्यासाठी एका बाजूला आ. जयकुमार गोरे यांनी चंग बांधला आहे. तर दुसर्या बाजूला त्यांच्याच पक्षाच्या खटाव व माण तालुक्याच्या दोन्ही अध्यक्षांनी आमदारांच्या या भूमिकेस ठेंगा दाखवत आघाडी धर्माचे पालन करणार असल्याची भूमिका पत्रकार परिषदेत जाहिर केली.
वडूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे यांच्या निवासस्थानी याबाबतची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी श्री. गोडसे यांच्यासह तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, माणचे तालुकाध्यक्ष एम.के. भोसले, उपनगराध्यक्ष विपूल गोडसे, अॅड. दिलीपराव शिंदे, माजी सरपंच अर्जुन गोडसे, दिनकर घार्गे, दिपक गोडसे, अॅड.संतोष भोसले, पै. रणजित देशमुख, पृथ्वीराज देशमुख, संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना गोडसे म्हणाले, खटाव तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते गेली 40 ते 50 वर्षे काँग्रेस बरोबर कायम आहेत. लोकसभा निवडणूकीतील माढा लोकसभा मतदार संघातील भूमिकेसंदर्भात आम्ही तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना भेटलो त्यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आम्ही तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आघाडी धर्माचे एकनिष्ठपणे पालन करून आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांना चांगल्या मताधिक्क्यांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू.
डॉ. देशमुख म्हणाले, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी तळागाळातील ते राष्ट्रीय मुद्द्यांपर्यंत भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभीमानी शेतकरी संघटना, पिपल्स रिपब्लीकन पार्टी (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची महाआघाडी झाली आहे. माढा लोकसभा मतदार संघातील खटाव तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळण्याची भूमिका घेतली आहे.
भोसले यांनी खटाव तालुक्यातील काँग्रेसने आघाडी धर्म पाळण्याच्या घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. यावेळी अॅड. भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच गोडसे यांनी प्रास्ताविक केले अनिल कचरे यांनी आभार मानले.
यावेळी धकटवाडीचे माजी सरपंच अर्जुन जाधव, संभाजी गोडसे, महेंद्र गोडसे, विक्रम गोडसे, सचिन घाडगे, विजय गोडसे, कल्याण देशमुख, फयाज मुलाणी, पंकज मेहता आदी उपस्थित होते.
माण पाठोपाठ खटाव काँग्रेस अध्यक्षांचाही आमदारांच्या भूमिकेला ठेंगा
RELATED ARTICLES