फलटण : महाराष्ट्राचे अराध्य दैवत छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य दिव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात येत असून फलटण शहर व तालुक्यातील शिवप्रेमींनी त्यामध्ये सहभागी होवून शोभा वाढवावी असे आवाहन समितीच्यातीने करण्यात आले आहे.
दरम्यान सोमवार दि. 6 मे रोजी सकाळी 9.00 वाजता म. फुले चौक येथून मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये शहर व तालुक्यातील तरुण तरुणी आपल्या मोटार सायकलसह सहभागी होवून रॅलीचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवार दि. 6 मे रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर राजेसाहेब यांच्या अधिकार गृहासमोरील पुतळ्यापासून भव्य, दिव्य शोभायात्रेस सुरुवात होणार असून सदरची मिरवणूक शहरातील महात्माफुले चौक-गजानन चौक- श्रीराम मंदीर – शंकर मार्केट- शुक्रवार पेठ- मलठण- पाचबत्ती चौक – बारामती चौक – छञपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरुन जाणार आहे. या मिरवणूकीत 3 वाहनांवर छ. शिवरायांच्या आकर्षक मूर्ती बसविण्यात येणार असून संपूर्ण मिरवणूकीत आणि मिरवणूकीच्या शुभारंभ ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. या मिरवणूकीत 30 घोडे व 6 उंट आणि त्यावर शिवशाहीतील पोषाखासह घोडेस्वार व उंट स्वार असणार आहेत. या मिरवणूकीत सातारा येथील महिला झांज पथक, फलटण येथील पुरुष झांज पथक, सोलापूरचे लेझीम पथक, माळशिरसचे हलगी पथक, फलटणचे सुंबळ पथक आणि बारामतीचे दांडपट्टा पथक सहभागी होवून मिरवणूकीचे आकर्षण ठरणार आहेत. मिरवणूकीच्या आग्रभागी तुतारी पथक राहणार आहे.
ही संपूर्ण मिरवणूक पाहिल्यानंतर प्रत्येकाला शिवकालाचा अनुभव निश्चितपणे येईल त्यातून छ. शिवरायांनी स्वराज्य उभारणीसाठी केलेले प्रयत्न त्यांना तत्कालीन मावळे व सर्वसामान्यांनी केलेली साथ स्वराज्य स्थापना, छ. शिवरांयाचा राज्याभिषेक, शिवशाहीतील सामान्य माणसाच्या मनातील समाधानाची भावना प्रत्येकाच्या मनासमोरुन तरळुन गेल्याशिवाय राहणार नाही साहजिकच या मिरवणूकीत सहभागी झालेला प्रत्येक जण त्याचप्रमाणे मिरवणूक पाहण्यासाठी आलेला अबालवृध्द समाज निश्चितपणे शिवरायांच्या त्या पराक्रमापुढे, त्यांच्या राज्यकारभार पध्दतीपुढे, समाजाप्रती असलेल्या त्यांच्या भावना आणि समाजाचा त्यांच्याप्रती असलेला आदरभाव स्मरुन नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही इतकी ही शोभायात्रा भव्य, दिव्य आणि शिवकालाची महती व माहिती समजावून देणारी ठरेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.
फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीने गेल्या 2 वर्षांपासून हा उपक्रम सुरु केला आहे. शिवजयंती उत्सव समितीचे हे तिसरे वर्ष आहे. शहरातील सर्व शिवजयंती उत्सव मंडळे आणि शिवप्रेमींना एकत्र करुन एकच भव्य दिव्य शिवजयंती साजरी केली जात आहे. यावर्षी त्यापेक्षा अधिक उत्साहात भव्य शिवजयंतीचे आयोजन करण्यात येत आहे.
शिवजयंतीनिमित्त फलटणला शोभा यात्रेचे आयोजन
RELATED ARTICLES