फलटण – महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर राहत असलेल्या लक्ष्मी विलास बंगल्यात घुसून खटाव तालुक्यातील एका युवकाने जोरजोराने आरडाओरड करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बंगल्यातील कुंड्यांची तोडफोड केल्यामुळे खळबळ उडाली असून याप्रकरणी संशयित युवकावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.6 जून रोजी रात्री 8:45 च्या सुमारास महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर राहत असलेल्या फलटण येथील विद्यानगर परीसरात असलेल्या लक्ष्मी विलास बंगल्यात घुसून विजय पांडुरंग मदने (वय 39) रा. भुषणगड ता.खटाव याने जोरजोराने आरडाओरडा करून सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नावाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत गोंधळ घातला. यावेळी संशयित आरोपी मदने याने बंगल्याच्या आवारात असणार्या झाडांच्या चार ते पाच कुंड्यांची तोडफोड केली. घटना घडली तेंव्हा बंगल्याच्या आवारात कोणीच नव्हते त्यामुळे याप्रकरणी सौरभ विनोद कणसे, रा.विद्यानगर फलटण यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित संशयित आरोपी विजय मदने याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान संशयित आरोपीने हे कृत्य का केले याबाबत फलटण पोलीस तपास करीत आहेत.
ना. रामराजेंच्या बंगल्यात घुसून खटाव तालुक्यातील युवकाची शिवीगाळ व बंगल्यातील कुंड्यांची तोडफोड
RELATED ARTICLES