– विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर
सातारा : सर्व सहायक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करुन जेथे आचारसंहितेचा भंग होत आहे असे निदर्शनास आल्यास तेथे परिणामकारक कारवाई करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.
लोकसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल, पुणे विभागीय उपायुक्त संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिलहाधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता आदी यावेळी उपस्थित होते.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान जनजागृतीवर भर द्या. यासाठी ग्रामीण भागात व शहरी भागात बँनर्स, पोस्टर्स, तसेच समाजात आदर्श असणार्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्या विविध माध्यमांद्वारे प्रसारित कराव्यात, अशा सूचना करुन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर पुढे म्हणाले, आचार संहिता कालावधीत कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. यासाठी पोलीस विभागाने दक्ष रहावे तसेच अतिरिक्त पोलीस जवानांची मागणी करावी. खर्च पडताळणी पथकाने प्रत्येक उमेदवाराच्या खर्चावर बारकाईने लक्ष द्यावे. तसेच सी व्हीजलवर व 1950 या टोल फ्री क्रमांकावर येणार्या प्रत्येक तक्रारींचा निपटारा करावा.
उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र भरण्यापूर्वी एक दिवस आगोदर बँक खाते उघडणे आवश्यक
उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र भरण्याच्या एक दिवस आगोदर निवडणूक खर्चासाठीचे बँक खाते उघडणे गरजेचे असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज सांगितले.
भरारी पथकांनी महामार्गावर वाहनांची तपासणी काटोकरपणे करावी. अवैद्य मद्याचा कोठेही पुरवठा होणार नाही यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने काळजी घ्यावी. निवडणुकीच्या अनुषंगाने ड्राय डे घोषीत केला जाणार आहे. या ड्रायडेच्या दिवशी बाहेर जिल्ह्यातून मद्य येणार नाही याची दक्षता घ्यावी.
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिव्यांग मतदारांना देण्यात येणार्या सुविधा मतदानाच्या दिवशी उपलब्ध करुन द्या. दिव्यांग मतदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी शेवटी केल्या. या बैठकीत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांचाही आढावा घेतला.
या बैठकीला सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.
आचार संहितेचा भंग करणार्यांवर परिणामकारक कारवाई करा
RELATED ARTICLES