सातारा : शिवप्रतिष्ठान हिंन्दुस्थान संघटनेचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची शुक्रवारी दुपारी जलमंदिर येथे भेट घेतली. भिडे गुरुजींनी राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्यासह उदयनराजेंशी पावणे दोन तास कमराबंद चर्चा केल्याने राजकीय भुवया उंचावल्या.
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशांच्या संदर्भात भिडे गुरुजींनी त्यांना काय कानमंत्र दिला याची उत्सुकता मात्र कायम राहिली. उदयनराजे यांनी मात्र गुरूजी नेहमीच आमच्या घरी येतात असे सांगत राजकीय चर्चेचा इन्कार केला व भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर मी राजकारणातून संन्यास घ्यावा म्हणतोय अशी बच्चन स्टाईल गुगली टाकली. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची भाजपच्या संपर्क सूत्रांची माहिती आहे. मात्र या घडामोडींची दखल प्रसारमाध्यमांना जर तरच्या स्वरूपात घ्यावी लागत आहे. उदयनराजे यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी जाहीर केलेल्या संभाव्य तारखांचाही इन्कार केला आहे. आता उदयनराजे भोसले यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सगळी राजकीय घडामोड पडद्याआडून चालल्याने जलमंदिरमध्ये काय घडतय? नक्की खलबते काय सुरू आहेत याचीच चर्चा आहे. तशातच छत्रपती घराण्यावर नितांत श्रद्धा असणार्या संभाजी भिडे गुरूजींनी जलमंदिरवर येऊन राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्याशी चर्चा केली.
यामध्ये खासदार उदयनराजे भोसले सुध्दा सहभागी झाले होते. भिडे गुरूजींनी उदयनराजे यांना काय सल्ला दिला? हे प्रसारमाध्यमांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. उदयनराजे म्हणाले, हे माझे एकट्याचे घर नाही मला भेटायला कोणीही येऊ शकते. भाजप प्रवेशाच्या प्रश्नाला त्यांनी खुबीने बगल दिली. नाही रे अजून काही ठरले नाही, आता तर मी राजकारणातून आलिप्त होण्याचा विचार करतो असे जाहीर करत उदयनराजे यांनी पत्रकारांचीच विकेट काढली. तुमच्या सारख्या मित्रांसमवेत राहण्याचा विचार करतोय असेही ते म्हणाले.
जलमंदिर येथे भिडे गुरुजींनी घेतली खा. उदयनराजे यांची भेट
RELATED ARTICLES