सातारा : खा. उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची तयारी सुरु आहे. असे असतानाच खा. अमोल कोल्हे यांनी उदयनराजे यांची सोमवारी भेट घेवून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. उदयनराजेंवर संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम असल्याने ते आपल्यासोबत असावे असे प्रत्येकाला वाटते. उदयनराजे योग्य निर्णय घेतील. त्यांची राष्ट्रवादीला साथ हवी, असे मत खा. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केले.
खा. अमोल कोल्हे यांनी सातार्यातील शासकीय विश्रामगृहावर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे दीड-दोन तास कमराबंद चर्चा झाली. उदयनराजेंचे मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत का असे विचारले असता डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, खा. उदयनराजे हे माझे मार्गदर्शक असून मी त्यांचा चाहता आहे. ऐतिहासिक मालिकांविषयी त्यांच्याशी बोललो. छत्रपतींचा मावळा म्हणून मी त्यांचं मन वळवू शकत नाही. छत्रपती हे निर्णय घेत असतात. उदयनराजे यांच्यावर महाराष्ट्राचं प्रेम असल्याने ते आपल्यासोबत असावेत असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. त्यांची आम्हालाही साथ असावी. स्वयंभू व्यक्तिमत्व स्वत: निर्णय घेत असतात. ते योग्य निर्णय घेतील. त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत, असेही त्यांनी सांगितले.
खा. उदयनराजे म्हणाले, टीव्ही सिरीयल सुरु होण्यापूर्वीपासून कोल्हे माझे मित्र आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नका. राजकारणाने एक दिवस गजकरण होतं, असेही उदयनराजेंनी सांगितलं. यावेळी चित्रखेला माने-कदम, सुनील काटकार आदि उपस्थित होते.
सातार्यात कोल्हे उदयनराजेंच्या भेटीला; मन वळवण्याचा प्रयत्न
RELATED ARTICLES