सातारा : सोळशी, ता. कोरेगाव येथील शनी देवस्थानच्या नंदगिरी महाराजांवर सोळशी येथील काही लोकांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. नंदगिरी महाराज गेल्या अनेक वर्षांपासून सोळशी येथील शनी देवस्थानमध्ये लोकांची सेवा करीत आहेत. अशा व्यक्तीवर पूर्वग्रहदूषित हेतूने वाठार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल सोळशी ग्रामस्थानी निषेध व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 15 सप्टेंबर 2019 रोजी सोळशी, ता. कोरेगाव येथील दिगंबर सदाशिव यादव (वय 20), प्रदीप सदाशिव यादव (वय 25), शेखर संजय यादव (वय 27), इंद्रजित मारुती यादव (वय 22), शेखर पोपट कांबळे (वय 23) व किरण सुरेश कांबळे यांनी नंदगिरी महाराजांच्या मुलीचा विनयभंग केल्याबाबतची तक्रार स्वत: त्यांच्या मुलीने वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर संबंधितांचे पालक नंदगिरी महाराजांना भेटण्यासाठी मंदिरात गेले होते. याठिकाणी याबाबत चर्चा झाली. परंतू तुमच्या मुलांनी जे कृत्य केले आहे, ते निश्चितच माफ करण्यासारखे नाही, असे महाराजांनी मुलांच्या पालकांना ठणकावून सांगितले. यानंतर 18 रोजी संबंधित मुलांच्या आईने नंदगिरी महाराजांवर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा सोळशी येथील ग्रामस्थांनी केला आहे.
नंदगिरी महाराज गेल्या अनेक वर्षांपासून येथील शनी देवस्थानची सेवा करीत आहेत. सोळशी येथील शनि देवस्थानमुळे सोळशीचे नाव संपूर्ण देशभर झाले आहे. सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातून भाविक याठिकाणी भेट देत असतात. नंदगिरी महाराजांचे कार्य मोठे असल्याने गावातील काही लोकांना याबाबत असुया वाटते. या असुयेपोटीच गावातील काही नतद्रष्टांनी नंदगिरी महाराजांच्या कन्येची जाणीवपूर्वक छेड काढली आहे. उलट नंदगिरी महाराजांवरच खोटा गुन्हा दाखल केला आहे. हा खोटा गुन्हा माघारी न घेतल्यास येत्या दिवसांमध्ये वाठार पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला जाईल, असा इशाराही सोळशी ग्रामस्थांनी दिलेला आहे.
याबाबत सोळशी ग्रामस्थ जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेणार असल्याची माहिती करसल्लागार अंकुश जाधव व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर यांनी दिली आहे.
नंदगिरी महाराजांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा सोळशी ग्रामस्थांकडून निषेध
RELATED ARTICLES