Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीसातारा मतदार संघात भगवा फडकणारच : ना.रावते

सातारा मतदार संघात भगवा फडकणारच : ना.रावते

शक्तीप्रदर्शनाने ना. नरेंद्र पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सातारा : शिवसेना, भाजपा, रिपाइं व मित्रपक्षाचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ना. नरेंद्र पाटील यांचा उमेदवारी अर्ज शनिवारी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने दाखल करण्यात आला. ना. चंद्रकांतदादा पाटील, ना. दिवाकर रावते, ना. विजय शिवतारे, ना. अतुल भोसले, ना. प्रा. नितीन बानुगडे -पाटील ना. शेखर चरेगावकर, आ. निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीमुळे सातार्‍यात जणू भगवे वादळच निर्माण झाले होते.यावेळी ना. रावते बोलत होते.
ना. रावते पुढे म्हणाले, 1996 ला सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा खासदार निवडून आला होता. आता शिवसेना भाजप युतीने माथाडीचे आराध्य दैवत आण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटण, सातारा, जावली, कराडसह आदी तालुक्यात आण्णासाहेब पाटील यांचे काम मोठे आहे. त्यांच्या पुण्याईमुळे सातारा मतदारसंघात पुन्हा एकदा भगवा फडकणार आह. सातारा मतदारसंघाचा हवा तसा विकास झाला नाही. त्यामुळे जनतेेत नाराजी आहे. सध्या केंद्रात व राज्यात युतीचे सरकार असल्याने नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट करु. रिपाइंचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष अर्ज दाखल करायला नसल्याबाबत ना. रावते यांना छेडले असता ते म्हणाले, ना. रामदास आठवले यांच्याशी आमची युती झालेली आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्रच आहोत.
ना. विजय शिवतारे म्हणाले, सातारा मतदारसंघातील उमेदवार हा फक्त शिवसेनेचा नसून युतीचा आहे. त्यामुळे भाजपा व सेना व रिपाईने एकदिलाने प्रचारात सहभागी घेतला आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांना विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही. नरेंद्र पाटील यांना मतदारसंघाचा खडा ना खडा माहिती आहे. माथाडी कामगारांची मोठी फौज त्यांच्याबरोबर आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे सातारा मतदारसंघाचा खासदार म्हणून नरेंद्र पाटील दिल्लीत जातील यात आम्हाला काही शंका वाटत नाही.
दरम्यान प्रारंभी सकाळी राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून गांधी मैदान राजवाडा येथून पदयात्रेस शुभारंभ करण्यात आला. या पदयात्रेत ना. दिवाकर रावते, ना. विजय शिवतारे, ना. प्रा. बानुगडे -पाटील, ना. अतुल भोसले, आ. शंभूराज देसाई, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, सदाशिव सपकाळ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, अ‍ॅड. भरत पाटील, हणमंत चवरे, महेश शिंदे, नगरसेवक विजय काटवटे, धनंजय जांभळे, सिध्दी पवार, अ‍ॅड. नितीन शिंगटे, श्रध्दा जाधव, संजय भगत यांच्यासह शिवसेना, भाजपा व मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राजवाडा गांधी मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार शक्तीप्रदर्शन करत काढलेल्या पदयात्रेदरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सतार्‍यात जणू भगवे वादळच निर्माण झाले होते. उन्हाचा तडाखा असूनही सातारा लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपर्‍यातून पदाधिकारी, कार्यकर्ते ना. नरेंद्र पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत ना. नरेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
एमआयडीसी बंद पाडणारांना हद्दपार करा : नरेंद्र पाटील
सातारा लोकसभा मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. विद्यमान खासदारांच्या दुर्लक्षामुळे मतदारसंघात कुठले उद्योगधंदे आले नाहीत. जे उद्योग होते त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे अनेक उद्योजकांना सातार्‍याकडे पाठ फिरवली. परिणामी युवकांना नोकर्‍या मिळत नाहीत. त्यामुळे एमआयडीसी बंद पाडणारांना जनता हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यात सध्या टोलच्या माध्यमातून काहींना आर्थिक रसद मिळत आहे. सध्या टोलनाक्यावर अनेक गैरप्रकार होत आहेत. टोलचा झोल बंद करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून सातारा जिल्ह्यातील महामार्गालगतच्या गावातील वाहनचालकांना तरी निदान टोल माफ व्हावा यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. भाजपा, शिवसेना व मित्रपक्षांनी एकत्रितपणे ही निवडणूक हातात घेतली असून या मतदारसंघात जनता परिवर्तन घडवून मला दिल्लीत पाठवेल, असा विश्‍वासही पाटील यांनी व्यकत केला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular